कल्याण : टोईंग व्हॅन कर्मचाऱ्यांनी गाडीचे नुकसान करून उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला. पीडित वाहनचालकाने फेसबुकवर पोस्ट टाकत हा प्रकार समोर आणला. संदीप मोरे असे या वाहनचालकाचे नाव असून त्यांनी गुरुवारी कल्याणच्या रामदेव हॉटेल परिसरात नवीकोरी दुचाकी पार्क केली होती. मात्र ही दुचाकी टोईंग व्हॅन कर्मचाऱ्यांनी उचलून नेली. त्यानंतर जेव्हा संदीप त्यांची दुचाकी सोडवण्यासाठी गेले, तेव्हा गाडीची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला. कारण त्यांच्या नव्या दुचाकीचं टोईंग कर्मचाऱ्यांनी मोठे नुकसान केले होते. गाडीवर अनेक ठिकाणी स्क्रॅच आले होते, तसंच गाडीच्या पुढे असलेले गार्डही तोडून ठेवण्यात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतरही अनेक ठिकाणी गाडीचे नुकसान झाले होते. त्यामुळे संदीप यांनी वाहतूक पोलीस आणि टोईंग कर्मचाऱ्यांना याबाबात विचारणा केली. त्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तर देत थेट इन्शुरन्स क्लेम करण्यास सांगितले. त्यामुळे उद्विग्न झालेल्या संदीप यांनी थेट फेसबुकवर गाडीचे फोटो टाकत व्यथा मांडली. यानंतर वाहतूक पोलिसांनी मात्र आम्ही असं कुठलेही नुकसान केलेले नसल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. 



तसेच चौकशी करून गाडीचे नुकसान झाले असेल, तर टोईंग कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करू, असे आश्वासन वाहतूक पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी दिले आहे.