`राष्ट्रीय प्रवाहात येण्यासाठी निरंजन डावखरे भाजपात`
तरुण, तडफदार नेतृत्व असल्याने भाजपाचे काम वाढविण्यास मदत होईल` असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई : 'मागील काही दिवसांपासून निरंजन डावखरे सतत संपर्कात होते. राष्ट्रीय प्रवाहात येण्याची त्यांची इच्छा होती. तरुण, तडफदार नेतृत्व असल्याने भाजपाचे काम वाढविण्यास मदत होईल' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून निरंजन डावखरे यांची शिफारस आम्ही करत आहोत त्याची मान्यता आम्हाला मिळेल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विकासाच्या दृष्टीकोनावर विश्वास ठेवून मी आज भाजपात प्रवेश करत असल्याचे निरंजन डावखरे यांनी सांगितले. कोकण पदवीधर मतदार संघातून त्यांना आमदारकीच तिकीट जाहीर करण्यात आलय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण आज राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर मी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. यापुढील वाटचाल मी लवकरच जाहीर करेन. असं त्यांनी म्हटलं आहे.
ठाण्यात भाजपाला तरुण चेहरा
निरंजन डावखरे याआधी शिवसेनेत जाणार असल्याची देखील चर्चा होती.निरंजन डावखरे हे भाजपकडून कोकण पदवीधरची निडवणूक लढवणार असल्याची देखील चर्चा आहे. निरंजन डावखरे हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंतराव डावखरे यांचे सुपुत्र आहेत. निरंजन डावखरे हे सध्या कोकण पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या दरम्यान त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणं हे भाजपसाठी फायद्याचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश नुकताच हा प्रवेश झालाय. ठाण्यामध्ये भाजपला यामुळे एक तरुण चेहरा मिळणार आहे. वसंत डावखरे यांचं ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मोठं वर्चस्व आहे. निरंजन डावखरे यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार आहे.