मुंबई : शिवसेनेबाबतच्या भूमिकेवरून नारायण राणेंच्या दोन्ही मुलांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं आहे, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. पण नितेश राणेंचं हे वक्तव्य निलेश राणे यांना मान्य नाही. याबाबतचं एक ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'नितेशच्या ह्या विषयाशी मी जराही सहमत नाही. ज्या पक्षानी राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरूनच करणार,' असं निलेश राणे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.



'झी २४ तास'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये राणेंनी शिवसेनेसोबतची कटुता संपवावी, असा सल्ला राणे कुटुंबाला दिला होता. यानंतर शिवसेनेवर टीका करणार नाही आणि मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळू, असं नितेश राणे म्हणाले होते.


कणकवलीमधून नितेश राणे भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत. तर याच मतदारसंघातून शिवसेनेनेही त्यांचा अधिकृत उमेदवार दिला आहे. नितेश राणेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरेही शिवसेना उमेदवारासाठी घेणार आहेत. या सभेमध्ये आपण शिवसेनेवर टीका करणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.