`केरळ मिनी पाकिस्तान; प्रियंकांना मत देणारे अतिरेकी!` नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य
Nitesh Rane News: नितेश राणे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यात त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
Nitesh Rane News: भाजप आमदार नितेश राणे हे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यांमुळं वादात सापडले आहेत. नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. केरळ हे मिनी पाकिस्तान म्हणून राहुल गांधींची बहीण (प्रियंका गांधी) तिथे निवडून येतात, असं वक्तव्य राणेंनी केलं आहे. पुण्यातील सासवड येथील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलंय.
पुण्यातील सासवड येथे अफजल खान वधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसंच, केरळचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला आहे.
'अफजल खान वधाचा भव्य असा कार्यक्रम आयोजित केला,या गोष्टीला शुभेच्छा देण्यासाठी मी आवर्जून येथे उपस्थित राहिलो. अफजल खान वधाचा पोस्टर तुम्ही लावू नका, यातून भावना दुखावतील असा स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं. ज्या देशात 85 टक्के हिंदू राहतात, आमच्या नसानसात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मग त्या महाराष्ट्रात त्या देशात आम्ही अफजलखानाच्या वधाचे पोस्टर लावायचे नाहीत? मग पाकिस्तान मध्ये लावणार का? चार दोन टकल्यांच्या भावना दुखवणार असतील तर मग त्यांनी पाकिस्तान, बांगलादेश येथे जाऊन दाढी कुरवाळावी,' असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.
'केरळ हे मिनी पाकिस्तान म्हणून राहुल गांधींची बहिण तिथे निवडून येते, सगळे अतिरेकी त्यांना मतदान करतात. दहशतवादी लोकांना हाताशी धरुनच हे लोक खासदार झालेले आहेत,' अशी टीका नितेश राणेंनी केली आहे.
आमच्या राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्यांचं रक्त भगवं आहे हे कडवट हिंदुत्ववादी आहे. त्यामुळे आम्हाला आता टोकाची भाषणे आणि कोणाला इशारा देण्याची गरज नाही. जो कायदा अन्य धर्मियांना लागतो तोच कायदा हिंदू धर्माला लागतो कायद्याच्या चौकटीत सगळं काम तर आम्हाला हेच अपेक्षित आहे. जे सगळे कायदे अन्य लोकांना लावता तोच कायद्या आम्हाला लावा, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.