शरद पवार जपानी बाहुलीसारखे; नितीन गडकरी यांचा मिश्किल टोला
शरद पवार जपानी बाहुलीसारखे दिसतात. प्रत्येकाला वाटतं साहेब आपल्याकडे बघतायत. गडकरींची कोपरखळी तर टीका करुन मैत्रीत दुरावा निर्माण करू नका, भुजबळांची प्रतिक्रिया.
Nitin Gadkari On Sharad Pawar : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शरद पवारांना मिश्किल भाषेत टोला लगावला आहे. शरद पवार हे जपानी बाहुलीसारखे आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं साहेब आपल्याकडे पाहत आहेत. मात्र, तिकीट वाटप होतं तेव्हा भलत्यालाच तिकीट मिळतं अशी कोपरखळी गडकरींनी मारली आहे. तर, गडकरी-पवार यांचे चांगले संबंध आहेत. मैत्रीत दुरावा निर्माण करु नये अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे.
एकीकडं शरद पवारांच्या उपस्थितीत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुरस्कार दिला जाणार आहे. त्यावरून वाद रंगला असतानाच आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शरद पवारांना उद्देशून मिश्किल टोलेबाजी केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
नितीन गडकरींनी भाजप कार्यकर्त्यांना सांगितला खास किस्सा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूरातल्या भाजप कार्यकर्त्यांना खास किस्सा सांगितला. हा किस्सा आहे डोळा मारणाऱ्या जपानी बाहुलीचा. हा किस्सा सांगताना नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मिश्किल टोला लगावला आहे.
नितीन गडकरी पवारांना जपानी बाहुली का म्हणाले?
शरद पवार आणि नितीन गडकरी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातले मुरब्बी नेते आहे. दोघांचे पक्ष वेगळे, दोघांची विचारधारा वेगळी आहे. तरीही दोघांमध्ये चांगले राजकीय संबंध आहेत. त्यामुळंच गडकरींच्या वक्तव्यामुळं अनेकजण बुचकळ्यात पडलेत. त्यामुळेच गडकरींनी पवारांसोबतच्या मैत्रीत दुरावा निर्माण करू नये, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या रुपानं निम्मी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपप्रणित एनडीएमध्ये सामील झाली आहे. आता शरद पवारांनी देखील भाजपशी जुळवून घेऊन एनडीएमध्ये सामील व्हावं, यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नेमकं अशावेळी गडकरींनी ही मिश्किल कोपरखळी लगावल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
महाविकास आघाडी फोडण्याचं काम काँग्रेसच करेल
महाविकास आघाडी फोडण्याचं काम काँग्रेसच करेल. लवकरच काँग्रेसचे आमदार मविआतून बाहेर पडतील असा मोठा गौप्यस्फोट माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी केला आहे. काँग्रेसचे आमदार अस्वस्थ आहेत असंही निंबाळकर म्हणाले आहेत.