अहमदनगर: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना आज राहुरी कृषी विद्यापीठातील पदवीदान समारंभात स्टेजवरच भोवळ आली. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. नितीन गडकरी हे हेलिकॉप्टरने शिर्डीत आले. तिथून ते राहुरीतील कार्यक्रमात गेले. तिथे जवळपास अर्धा तास नितीन गडकरी यांनी भाषण केले. यानंतर कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी नितीन गडकरी यांनी मंचावरच भोवळ आली. सुदैवाने यावेळी राज्यपाल विद्यासागर राव गडकरींच्या बाजूला उभे होते. गडकरींना चक्कर येत असल्याचे बघून विद्यासागर राव यांनी लगेचच त्यांना सावरले. यानंतर गडकरी यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. प्राथमिक उपचारानंतर ते स्वतःच चालत गेले आणि वाहनात बसले. 


दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर गडकरी यांनी ट्विट करून आपली प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी विशिष्ट प्रकारचा गाऊन परिधान करावा लागतो. या पोशाखामुळे गडकरी यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यातच हा समारंभ एका बंदिस्त सभागृहात झाल्याने त्यांचा श्वास गुदमरू लागला. श्वास गुदमरल्याने भोवळ आल्याचे गडकरी यांनी सांगितले.