नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुणे सातारा रोड हा सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा झालाय. सहा पदरीकरणाचं आठ वर्ष रखडलेलं काम, अनेक ठिकाणी अर्धवट झालेली कामं आणि डायव्हर्जन यामुळे हजारो अपघात होतात आणि शेकडो मृत्यू... हे रखडलेलं काम म्हणजे 'काळा डाग' अशी टीका खुद्द नितीन गडकरींनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'काळा डाग' असं खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रीच ज्या कामाचं वर्णन करतात, त्या पुणे - सातारा रस्त्याचं रखडलेलं काम शेकडोंच्या आयुष्यात 'काळ' म्हणून आलेलं आहे.


- पुण्याजवळ कात्रज बोगद्याच्या बाहेर शिंदेवाडी येथे आई आणि मुलगी वाहून जाण्याची दुर्घटना


- नीरा नदीत कार पडून झालेला चार मित्रांचा मृत्यूची घटना


- नुकताच झालेला शिंदेवाडी येथील बस आणि ट्रकचा अपघात


- देहू रोड ते कात्रज दरम्यान वेगवेगळ्या अपघातात झालेले तब्ब्ल एकशे १० मृत्यू


'रिलायन्स इन्फ्रा'कडे काम


या सर्व अपघातांना जबाबदार आहे ते रस्त्याचं अर्धवट काम... पुणे पोलिसांनीच तसा अहवाल दिला होता. या रस्त्याच्या सहा पदरीकरणाचं काम आहे रिलायन्स इन्फ्राकडे आहे... हे काम सुरु झालं ऑक्टोबर २०१० मध्ये... काम सहा पदरीकरणाचं म्हणायलाच आहे. कारण हा रस्ता आधीच चौपदरी आहे. म्हणजेच दोनच लेन करायच्या आहेत. हे काम डिसेंबर २०१३ ला पूर्ण करायचं होतं. पण २०१७ संपत आलं तरी काम काही पूर्ण होताना दिसत नाही. काम सुरु केल्याच्या पहिल्या दिवसापासून रिलायन्स इन्फ्रा टोलवसुली करत आहे हे विशेष. आता सहा महिन्यात काम पूर्ण होईल असं नितीन गडकरींनी सांगितलंय पण तशी शक्यता कमीच आहे.


कंपनीवर कारवाई कधी?


काम पूर्ण करायला चार वर्ष उशीर होऊनही रिलायन्स इन्फ्रावर मात्र काहीच कारवाई झालेली नाही. केवळ रिलायन्स इन्फ्राला या कामातून टर्मिनेट करावं असा प्रस्ताव नॅशनल हायवे ऑथोरटीने दिला होता, पण पुढं काही झालं नाही. रिलायन्स इन्फ्राला टोलमधून मिळणारा हिस्साही तात्पुरता बंद करण्यात आला होता. दंडात्मक कारवाई झाली नाही. परिणामी मागील आठ वर्ष वाहन चालक त्रास सहन करतायेत. रखडलेलं भूसंपादन, वन विभागाची जमीन अशा कारणांमुळे कामं पूर्ण व्हायला उशीर झाला. १४० पैकी १२३ किलोमीटरचं काम झालं आहे. उर्वरित १८ किलोमीटरचे काम सहा महिन्यात पूर्ण होईल असं नॅशनल हायवे ऍथॉरिटीचे म्हणणं आहे. त्यांचा हा दावा खरा ठरो, हीच अपेक्षा या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची आहे.