विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादेत एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी रस्त्यांची कामं आणि टक्केवारीवरून राजकारण्यांना चिमटा काढला. त्यावरून औरंगाबादमध्ये राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. औरंगाबादेत महाएक्स्पो समारोपात नितीन गडकरींनी काढलेला हा चिमटा...नेत्यांच्या टक्केवारीमुळं रस्त्यांची कामं होऊ शकली नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरींनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. मात्र तो मी नव्हेच, असा पवित्रा शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी घेतला. औरंगाबाद जळगाव रस्ता रखडल्यानं नितीन गडकरींनी केलेल्या टीकेचा रोख रावसाहेब दानवेंच्या दिशेनं वळवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.



यावरून आता भाजपनंही खैरेंवर पलटवार केला. २० वर्षांच्या खासदारकीच्या काळात खैरेंनी कुठं आणि किती निधी खर्च केला, याची माहिती देण्याचं आव्हान भाजपनं दिलं.


मराठवाड्तील रस्त्यांची कामं रेंगाळलीत, हे सत्य आहे. आता केंद्रीय मंत्र्यांनीच नेत्यांच्या टक्केवारीवर बोट ठेवल्यानं नेत्यांना ही टीका झोंबलीय. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपमध्ये यावरून पुन्हा कलगीतुरा रंगला आहे.