Sushma Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या विरोधकांवर तुटून पडताना दिसत आहे. आपल्या भाषणांमधून शिदें गटातील नेत्यांसह भाजपलाही (BJP) त्या लक्ष्य करताना दिसत आहेत. नुकतीच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावरही टीका केली होती. त्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (sushma andhare on nitin gadkari) यांच्याबाबत खळबळजन खुलासा दावा केला आहे. महाप्रबोधन यात्रेनिमित्त भंडाऱ्यात असताना त्यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे यांना ट्रॅपमध्ये अडकवायचे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. सुषमा अंधारे यांच्या या विधानाने नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. या दाव्यासह सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे. सुषमा अंधारे यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


काय म्हणाल्या सुषमा अंधारे?


"एक काळ होता जेव्हा नागपूर आणि बीड यांच्यात संघर्ष चालायचा. या बाजूला नितीन गडकरी आणि तिकडे गोपीनाथ मुंडे अशी स्थिती होती. नितीन गडकरी बहुजनांचे नेते गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये अडकवायचे. गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक परेशान, हैराण करायचे. त्यानंतर दुसऱ्या पिढीतही तेच सुरू झाले. देवेंद्र फडणवीस लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या मागे लागले आहेत. त्यांनी पंकजा मुंडे यांना हैराण करण्यास सुरूवात करण्यात आली," असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.


...तर महाप्रबोधन यात्रेच्या स्टेजवर दिसणार नाही - सुषमा अंधारे


"मीसुद्धा बीडमधील आहे, त्यामुळे त्यांना वाटतंय की ते मला हैराण करू शकतील. मात्र ते भ्रमात आहेत. तुम्ही माझ्यामागे ईडी लावू शकत नाहीत. उभ्या महाराष्ट्रात माझ्या नावावर कुठेही एक एकर जमीन नाही. माझ्या नावावर कुठेही जमीन असेल तर मी यानंतर महाप्रबोधन यात्रेच्या स्टेजवर दिसणार नाही. मी कष्टाची भाकरी खाते. माझी आई कोरडवाहू जमिनीत राबते. माझ्या कुटुंबियांना राजकारणाबाबत काहीही माहिती नाही," असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.


राज ठाकरेंवरही टीका


सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावरही टीका केली होती.  "आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा 'उठ दुपारी आणि घे सुपारी' असाच कार्यक्रम असतो. 'उठ दुपारी, घे सुपारी' असं करताना ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात," अशी जहरी टीका त्यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली होती.