मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा पेच सुटला तरी आता नवीन समीकरण पुढे आले आहे. राष्ट्रवादीचे विधीमंडळाचे गटनेते अजित पवार यांनी भाजपसोबत जात राज्यात सरकार स्थापन करण्यात पुढाकार घेतला आहे. आज सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्रिकेट आणि राजकारणात शेवटपर्यंत काहीही घडू शकते, असे विधान केले होते. त्याचा प्रत्यय आज सकाळी दिसून आला. कारण शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीची आज शेवटची बैठकीत होऊन सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार होता, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्याआधी राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज राजभवनात सकाळी ८ वाजता शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.



अजित पवार यांनी राष्ट्रवादीला मोठा हादरा दिला आहे. त्यामुळे महाविकासआघाडीच्या प्रयत्नाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, अजित पवार यांनी जे आमदारांच्या सह्यांचे पत्र सादर केले आहे. त्यावर आक्षेप राष्ट्रवादीकडून घेण्यात आला आहे. पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अजित पवार यांनी  फसवले आहे, असे सांगत गटनेत्यांना दिलेले पत्र त्यांनी सादर केले आहे. त्याचवेळी अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांनाही दे धक्का दिला आहे. 


गडकरी यांनी ट्विट केले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित दादा पवार यांनी शपथ घेतल्या बद्दल अभिनंदन. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगाने पुढे जाईल हा ठाम विश्वास आहे. गडकरी यांनी ट्विट करुन नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.