नागपूर महापालिकेची कमाल....कमी डोजमध्ये केले जास्त जणांचं लसीकरण
आरोग्य कर्मचाऱ्यांना असलेल्या अपुऱ्या प्रशिक्षणामुळे आणि योग्य नियोजन नसल्याने अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीचं हजारो डोज वाया गेले.
अमर काणे, झी 24 तास, नागपूर : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात लसीकरणं (Corona Vaccination) सर्वात प्रभावी अस्त्र असताना तामिळनाडूसह अनेक अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीचं हजारो डोज वाया गेलेत. खरंतर अनेक राज्यात लसींचा तुटवडा असताना तिथल्या आरोग्य विभागानं (Health Department) लसीकरण करताना खबरदारी आणि काळजी नं घेतल्यानं हजारो डोजची नासाडी झालीय.मात्र नागपूर महानगरपालिकेनं (Nagpur Muncipal Corporation) लसींचा प्रत्येक थेंबचा पुरेपुर वापर केला. महापालिकेला सरकारकडून आजवर कोव्हीशील्ड (Covishield vaccine ) लशींचे 10 लाख 25 हजार डोज मिळाले असताना . महापालिकेने त्यातून 10 लाख 60 हजार लोकांचे लसीकरण करून दाखविण्याची किमया साधली.
कोणत्याही सरकारी वस्तू, साहित्यचा काळजीपूर्वक आणि सर्वसमावेशक पद्धतीनं वापर करण्याची सवय अजूनपर्यंत आपल्याकडे फारशी रुजली नाही. त्याचाच प्रत्यय कोरोनाविरुद्धच्या युद्धात सुरक्षाकवच असलेली लस वापराताही अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात निष्काळजीपणा दिसून आला. लसींच्या तुडवड्यामुळं अनेक ठिकाणी लसीकरण मोहिमेत अडचणी येत असताना लसीकरणातील वायलमधील डोजचा प्रत्येक थेंब अचूक, काटेकोरपणे वापरणं गरजेचं आहे. मात्र त्याच्यात अनेक ठिकाणी नासाडी झालेली आढळून आली. पण नागपूर महापालिका याबाबत अपवाद ठरली.
आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
नागपूर महापालिकेला 16 फेब्रुवारीपासून राज्य सरकारकडूनं 10 लाख 25 हजार डोज मिळाले. यामध्ये महापालिकेकडून 35 हजार जास्त लोकांचे अर्थात 10 लाख 60 हजारांचे लसणीकरण झालंय. आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलेलं प्रशिक्षण, नियमांचं काटेकोर पालनं यांमुळं महापालिकेला हे साध्य करता आलंय.
एका वायलमध्ये 5.5 मिलिलिटर एवढं द्रव असत. एका कुपीमध्ये .055 किंवा 0.6 एमएल अतिरिक्त द्रव असतं. 10 लोकांना तो विभागून देताना प्रत्येकाला ठराविक डोज दिले तर लसीचा थेंब न थेंब वापरला जातो. त्याचचं तंतोतंत वापर करत गेल्या 5 महिन्यात तब्बल 35 हजार अतिरिक्त लोकांचे लसीकरण महापालिकेने केले. विशेष म्हणजे एक वायल उघडल्यानंतर 10 जणांचा डोज 4 तासात देणे आवश्यक आहे. या नियमांचं नागपूर शहरातील महापालिकेच्या 156 लसीकरण केंद्रांवर काटेकोर पालनं करण्यात आलं. त्यामुळे आता प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिलेल्या व्हॉयलच्या क्षमतेपेक्षा जास्त लसीकरण शक्य होत आहे.