जयेश जगड, झी मीडिया, अकोला : राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांनी एका शाळेत जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर दिसतोय. याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. पण पाच दिवस उलटले तरी पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घुंगशी हे गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांचं मूळ गाव... त्या गावात त्यांचे वडील आणि माजी आमदार विठ्ठल पाटील यांचं कॉलेज आहे. तसंच त्यांचे विरोधक 'विज्युक्टा' संघटनेचे पदाधिकारी प्रा. संजय देशमुख यांचीही शिक्षण संस्था आहे. या दोन्ही संस्थांमध्ये २०१० पासून न्यायालयीन वाद सुरू आहेत. गेल्या १ जुलैला या वादाचा पुन्हा एकदा भडका उडाला.


गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या वडिलांनी भाऊसाहेब देशमुख महाविद्यालयात जाऊन तपासणी करायला सुरूवात केली. त्यांच्यासोबत माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. विठ्ठल पाटील शाळेची तपासणी करत असताना प्राचार्य संजय देशमुख यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ शुटिंग घ्यायला सुरूवात केली. त्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. 


 


संस्थेची तपासणी करणारे तुम्ही कोण? असं विचारल्यावर पाटील यांनी शिवीगाळ सुरू केली. हा वाद एवढा वाढला की विठ्ठल पाटील यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात देखील लगावली, असं व्हिडिओतही दिसतंय. याप्रकरणी माजी आमदार विठ्ठल पाटील यांच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली. पण गृह राज्यमंत्र्यांचे वडील असल्यानं कारवाई होत नसल्याचं सांगितलं जातंय.


मात्र, विठ्ठल पाटील यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचा इन्कार केलाय. तसंच या प्रकरणी पोलीस तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप केला जाणार नाही, अशी ग्वाही गृह राज्यमंत्र्यांनी दिलीय.


रणजीत पाटलांनी ग्वाही दिली असली तरी पोलीस मात्र या विषयावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. मुळात विठ्ठल पाटील शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत कोणत्या अधिकारात कॉलेजमध्ये गेले? ते या अधिकाऱ्यांना कागदपत्र तपासणीचे आदेश कसे देऊ शकतात? घटनेच्या दिवशीच मूर्तिजापूर पोलिसांनी तक्रार का नोंदवून घेतली नाही? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत.