पालघर : पालघर जिल्हात आज सकल मराठा समाजाचा बंद मागे घेण्यात आला आहे. आज 9 आगस्ट हा दिवस पालघरमध्ये आदिवासी क्रांती दिवस म्हणून मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. त्यामुळे आज आदिवासी संघटनांचे विविध कार्यक्रम पालघर जिल्ह्यात आयोजित करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यात आदीवासी दिन साजरा करताना कुठल्याही प्रकारे व्यत्यय येऊ नये यासाठी सकल मराठा समाजाने पालघर मधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 


विश्व आदिवासी दिवसाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाचे कार्यक्रम लक्षात घेवून आजचा मराठा समाजाने पुकारलेला नंदुरबार बंद पुढे ढकलण्याच निर्णय मराठा समाजाच्या समन्वयकांनी घेतला आहे. सोबतच शिवसेना जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांच्या वायरल क्लिपवरुन निर्माण झालेला वाद देखील निवळला आहे. या क्लिपचे आवाहन स्विकारुन आंदोलनासाठी आमदार हर्षवर्धन जाधव नंदुरबारमध्ये दाखल झाले होते. मात्र या क्लिपमधील विधान नासमजतीतून बोलल्या गेल्याचं आमश्या पाडवीचे पत्र हर्षवर्धन जाधव यांना प्रशासनाने दिल्यानंतर त्यांनी देखील हा वाद मिटल्याचे सांगितलं.