योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : नांदेडच्या (Nanded News) शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात (Shankarao Chavan Government Hospital) गेल्या काही दिवसांपासून मृत्यू तांडव सुरु आहे. तीन दिवसांपूर्वी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. विरोधकांकडून टीका होत असतानाही रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीये. केंद्रीय मंत्र्यांनी देखील या रुग्णालयला भेट दिली होती. मात्र आता राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी या घटनेवरुन हात झटकले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेडच्या घटनेचा आरोग्य विभागाशी काहीही संबंध नाही. नांदेड रुग्णालय आरोग्य विभागाच्या अखत्यारीत येत नसल्याचा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. नांदेड शासकीय रुग्णालय हे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या खाली येते. तसेच या रुग्णालयात अधिष्ठाता स्वतः बसतात, असेही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता आणखी वाद उद्धभवण्याची शक्यता आहे.


राज्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या औषध खरेदी रखडलेली नाही. वेळ पडल्यास डीपीडीसीच्या माध्यमातून औषधांची खरेदी केली आहे. मात्र राज्यातील विरोधकांनी या गोष्टीचा प्रपोगंडा केला आहे असा आरोप तानाजी सावंत यांनी केला आहे. तानाजी सावंत हे आज नाशिकमध्ये केंद्रीय पातळीवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कॉन्फरन्समध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते. त्यावेळी त्यांनी या घटनेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.


आरोपी करण्याअगोदर हे खातं कोणत्या पक्षाकडे आहे याची चौकशी करायला हवी होती. ज्या पक्षाकडे खातं आहे त्याच पक्षाच्या नेत्याने आरोप केले असल्याची खंत तानाजी सावंत यांनी व्यक्त केली. राजकारणात ज्याचा आता जन्म झाला त्यांनी असे करणे योग्य नाही असेही तानाजी सावंत म्हणाले. त्यामुळे एकूणच सत्तेत बसलेल्या पक्षांमध्ये नांदेड घटनेवरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फेरी रंगू लागल्याचे समोर आलं आहे.


दरम्यान, वैद्यकीय शिक्षण हे खातं मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे. नांदेडच्या घटनेनंतर त्यांनी रुग्णालयाला भेट देत गंभीर आरोप केले होते. "रुग्णालयाने मिळालेले पैसे औषध खरेदीसाठी का वापरले नाहीत, असा सवाल महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. मुश्रीफ यांनी हाऊसकीपिंगच्या प्रश्नांवर तीव्र चिंता व्यक्त केली आणि ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली जात असल्याचे सांगितले. पुरेसा निधी असूनही रुग्णालयाकडून औषध खरेदीला होत असलेल्या दिरंगाईबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. प्रत्येक व्यक्तीचे जीवन आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. निधीचा प्रश्न नाही, परंतु त्यांनी वेळेवर औषधे का खरेदी केली नाहीत. आम्ही डीनला 40 टक्के औषधे खरेदी करण्यास परवानगी दिली. आम्ही त्यात लक्ष घालू," असे मुश्रीफ यांनी म्हटलं होतं.