अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूरमध्ये कोरोनाने थैमान घातलं होतं. कोरोनामुळे नागपूरमध्ये परिस्थिती देखील गंभीर झाली होती. मात्र नागपूरकरांनी यावर मात करत या कठीण परिस्थितीत कमालीची सुधारणा केली आहे. कारण नागपूर शहरात शनिवारी एकंही कोरोनाचा नवा रूग्ण आढळलेला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर शहरात पहिल्या आणि दुसऱ्या कोरोना लाटेनंतर शहरात प्रथमच एकंही कोरोना बाधित रूग्ण आढळलेला नाही. तर ग्रामीण भागात केवळ एकच कोरोना बाधित आढळला. शहरात काल झालेल्या 4 हजार 856 चाचण्या झाल्यात यामध्ये एकंही कोरोनाबाधित आढळला नाही.


शनिवारी शहर आणि ग्रामीणमध्ये मृत्यूही शून्य आहे. सहा महिन्यांपूर्वी कोरोनाच्या लाटेने नागपूर शहर व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये हाहाःकार माजवला होता. दुसर्‍या लाटेदरम्यान रुग्णांना खाटा उपलब्ध होत नव्हत्या. मात्र हळूहळू दुसर्‍या लाटेचा प्रकोपही ओसरण्यास सुरुवात झाली. संभाव्य तिसर्‍या लाटेचे संकट कायम असलं तरी, आता सध्या तरी नागपुरातून कोरोना हद्दपार होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं शनिवारच्या आकडेवारीवरून दिसून येतंय.


दरम्यान कालच्या दिवसात दहा जण कोरोनावर यशस्वीरित्या मात करून सुखरूप आपल्या घरीही परतले आहेत. विशेष म्हणजे, नागपूर शहरात पहिल्यांदाच शून्य बाधिताची नोंद करण्यात आली.


11 मार्च 2020 रोजी कोरोनाने नागपुरात धडक दिली. त्यानंतर हळूहळू कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होताना दिसून आली. जिल्ह्यात 5 एप्रिल 2020रोजी पहिल्या कोरोना बळीची नोंद झाली होती. यानंतर गेल्या आलेल्या पहिल्या लाटेत रुग्णसंख्येत मोठी वाढ पहायला मिळाली. यानंतर पहिली लाट ओसरत असतानाच वर्ष 2021 च्या फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर माजवण्यास सुरुवात केली. 


जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 4 लाख 82 हजार 635 वर पोहोचली असून, रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 97.91 टक्क्यांवर आहे. सद्यस्थितीत शहरात 147, ग्रामीणमध्ये 32 व जिल्ह्याबाहेरील 4 असे 183 सक्रिय रुग्ण आहेत.