प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : संपूर्ण देशात दिवाळीची धामधूम सुरु आहे, मात्र धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुष्काळामुळे दिवाळी सणावर विरजण पडलंय. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही आणि मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे दुसऱ्यांची दीवाळी पहाण्यावाचून पर्याय नाही अशी अवस्था झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुठं फटाक्यांची आतषबाजी... कुठे मिठाईचे वाटप... तर कुठं खरेदीची लगबग... देशभरात दिवाळीचा उत्साह आहे. मात्र, धुळे-नंदुरबारमध्ये वेगळंच चित्र पहायला मिळतंय. ओस पडलेले रस्ते... कुलूपबंद घरं... आणि गावाच्या चौकात हताश चेहऱ्याची माणसं... दुष्काळामुळे या भागाला अवकळा आलीय. पाण्याअभावी पीकं करपून गेलीत. शेतकऱ्यांचे हात रिकामे झालेत.


केवळ शेतकरीच नाही तर मजूर वर्गही दुष्काळाच्या तडाख्यात सापडलाय. हाताला काम नाही. जिथं एकवेळच्या जेवणाची भ्रांत असताना दिवाळी कशी साजरी करायची? असा प्रश्न मजूर वर्गाला पडलाय.


या शेतकऱ्यांची आणि मजुरांची दिवाळी काहीशी गोड करण्यासाठी आपण आपल्या करंजीचा एक घास त्यांना दिला तर मानवतेची हात दिवाळी सणाला निश्चित बळकट होतील.