दीपक भातुसे :  नवी मुंबई, वसई-विरार आणि औरंगाबाद  या तीन महानगरपालिकांची निवडणूक कोरोना व्हायरसच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे या तीनही महापालिकांवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. यापैकी औरंगाबाद आणि नवी मुंबई या दोन्ही महापालिकेतील पदाधिकाऱ्यांची मुदत येत्या काही दिवसांत संपत असल्याने या दोन्ही महापालिकांत आता प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद महापालिकेची मुदत आजच म्हणजे २८ एप्रिल रोजी संपत आहे. नवी मुंबई महापालिकेची मुदत ७ मे रोजी संपणार आहे. तर वसई विरार महापालिकेची मुदत २८ जून रोजी संपणार आहे. कोरोनामुळे या तीनही महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे या तीनही महापालिकांवर प्रशासक नेमण्यात यावा असे पत्र निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहे.


कोरोनाच्या संकटात या महापालिकांना मुदतवाढ मिळेल अशी चर्चा होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाने निवडणूक आयोगाने या महापालिकांना मुदतवाढ न देता त्यांच्यावर प्रशासक नियुक्त करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला केल्या आहेत.


राज्यात भाजप सरकार असताना धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर पालिकांना आरक्षणाच्या मुद्यावर मुदतवाढ देण्यात आली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ रद्द करून प्रशासक नेमण्याचे आदेश दिले होते. याचाच दाखला देत निवडणूक आयोगाने तीनही महापालिकांमध्ये कोरोनाचे संकट असले तरी मुदतवाढ न देता प्रशासक नेमण्याच्या सूचना राज्य सरकारला केल्या आहेत.


औरंगाबाद महानगरपालिकेची मुदत आजच संपत असून बुधवारी २९ एप्रिल रोजी नवे सभागृह अस्तित्वात येणे अपेक्षित होते. निवडणूक आयोगाच्या सूचनेमुळे औरंगाबादच्या महापौरांसह महानगरपालिकेचे पदाधिकारी आजचा दिवसच पात्र आहेत. राज्य सरकारकडून मुदतवाढ मिळेल अशी आशा सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना होती. मात्र त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.


औरंगाबादमध्ये सध्या गेली २५ वर्षे शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये आता दुरावा निर्माण झाला आहे. पण औरंगाबादमध्ये दीर्घकाळ दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत राहिले आहेत


.



दुसरीकडे नवी मुंबईत दीर्घकाळ गणेश नाईक यांची सत्ता आहे. नाईक आधी शिवसेनेत होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून दोन दशकं महापालिकेतही वर्चस्व राखलं होतं. विधानसभा निवडणुकीपूर्वी नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. औरंगाबाद आणि नवी मुंबई या दोन्ही महापालिकांत भाजपविरोधात महाविकास आघाडी असा सामना होण्याची शक्यता असून महाविकास आघाडीत निवडणुका एकत्र लढवण्याबाबत याआधी चर्चा झाली होती. तर वसई, विरार महापालिका अस्तित्वात आल्यापासून हिंतेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे.