संभाजीराजे यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारे वक्तव्य.... काय आहे राजेंची रणनिती
Chhatrapati Sambhaji Raje : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्यांनी अवमान केला त्या कोश्यारी यांची अजून ही आपण चर्चा करत आहोत, अशीही खंत संभाजीराजे यांनी व्यक्त केली
Chhatrapati Sambhaji Raje : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे जु्न्या काळातील आदर्श आहेत, असे विधान केल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे. राज्यापालांना परत बोलवण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. भाजपने मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही असे म्हणत राज्यपालांबाबत उघडपणे भूमिका घेतलेली नाही. अद्याप राज्यपालांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने शिवप्रेमी संघटनांकडून महाराष्ट्रभर बंद (Maharashtra) पाळण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडूनही 17 डिसेंबर रोजी मोर्चाची हाक दिली आहे. अशातच कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.
राज्यपालांनी साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही
राज्यपालांना महाराष्ट्राच्या बाहेर पाठवून, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी दिला आहे. पिंपरी चिंचवडमधील सर्वपक्षीय बंदच्या कार्यक्रमात बोलताना संभाजीराजेंनी हा इशारा दिला आहे. "छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहेत. महाराष्ट्रात एक माणूस नाही जो आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांना मानत नाही, असे म्हणेल. जो तसं म्हणेल त्याचा थेट कडेलोट होतो याची सर्वांना कल्पना आहे. शिवाजी महाराज यांचा ज्यांनी अवमान केला त्या कोश्यारी यांची अजून ही आपण चर्चा करत आहोत. राज्यपालांनी शिवरायांचा दोनदा अवमान केला. त्यांनी साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही. आता दिलगिरी व्यक्त केली तरी आम्ही ऐकणार नाहीत, असे संभाजीराजे म्हणाले.
शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रेम आहे तर तुम्ही गप्प का आहात?
"शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रेम आहे तर तुम्ही गप्प का आहात? तुम्ही वर काय निरोप पोहचवला हे सांगा. तुम्ही हा निरोप पोहचवला का की, महाराष्ट्रातून कोशारींची हकालपट्टी व्हायला पाहिजे, असा प्रश्न विचारत संभाजीराजेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. राज्यपालांपाठोपाठ आणखी काही जण वादग्रस्त बोलले आहेत. प्रसाद लाड, रावसाहेब दानवे, हे बोलले आहेत. यांच धाडस तरी कसं होतं. पिंपरी-चिंचवड या शहरातून सुरू झालेल्या आंदोलनाचा हा प्रवास महाराष्ट्र बंदच्या दिशेने सुरू झाला आहे," अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी दिली आहे.