निलेश वाघ , झी २४ तास, नांदगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज नांदगांव दौऱ्यावर आल्या असता राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी समोर आली. राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुत्र नांदगाव तालुक्याचे आमदार पंकज भुजबळ यांचे छायाचित्र टाळले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. आज भुजबळांनी धनंजय मुंडे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी मी इथेच आहे असे माध्यमांना सांगितले. पण राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये  अस्वस्थता आहे. नांदगावमध्ये स्वागत फलकावरून भुजबळ पिता-पुत्रांचे  छयाचित्र कार्यकर्त्यांनी टाकणे टाळल्याने तालुक्यातून जोरदार चर्चा होत आहे. 


सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत नांदगाव जैन धर्म शाळेत झालेल्या मेळव्याकडे नाराज पदाधिकारी फिरकले नाही. उलट सुळे चाळीसगाकडे जात असताना नस्तनपुर येथे सुळे यांची भेट घेवून गाऱ्हाणे मांडले. त्यामुळे नांदगांव मतदार संघात भुजबळांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 



आमदार पंकज भुजबळ यांच्या कार्यपद्धती आणि पीए संस्कृतीवर  पदाधिकाऱ्यामध्ये मोठी नाराजी असून अनेकांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्ष नेतृत्वाकडे सुपुर्द केले आहेत. भुजबळांच्या विरोधात बैठकाही घेण्यात आल्या. तालुक्यात आता भुजबळ नको. स्थानिक भूमिपुत्रांना संधी देण्याचा सूर आवळत थेट भुजबळांच्या विरोधात बंड पुकारले होते.