विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाड्यांवर अद्यापही शैक्षणिक सुविधा नसल्याने शाळाबाह्य मुलांचा प्रश्न निर्माण झालाय. 


आदिवासी भागात शैक्षणिक असुविधा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे शासन शैक्षणिक सुविधांवर करोडो रुपये खर्च करते तर दुसरीकडे आदिवासी भागात शैक्षणिक सुविधा मिळत नसल्याने अद्यापही आदिवासी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. जळगाव जिल्ह्याच्या उत्तर दिशेला महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश च्या हद्दीवर विस्तीर्ण असा सातपुडा पर्वत आहे. या पर्वत रांगेत चोपडा आणि यावल तालुक्यात अंबापानी, चारमाळी तसंच रुईखेडा, लंगडाआंबा, उसमळी यासह इतर शेकडो आदिवासी पाडे आहेत. या पाड्यावरील आदिवासी मुले स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही शिक्षणापासून वंचित आहेत. 


कडक वनकायद्यामुळे प्रशासनाचा निरुत्साह


कडक वनकायद्यामुळे जिल्हा प्रशासनाचा या ठिकाणी शाळा सुरु करण्यास निरुत्साह दिसून येतोय. या ठिकाणी स्थानिक शिक्षकांना प्राधान्य देऊन शाळा सुरु केल्यास या मुलांना शिक्षण घेणे सोपे होणार आहे. 


चंद्रकांत पाटीलांचं आश्वासन


सातपुडा पर्वतरांगामध्ये मुलांना शिक्षण नसल्याने तेही जंगलातच भटकंती करतात. या आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. 


आदिवासी भागात शासकीय आश्रमशाळा सुरु करण्यात आल्याय. मात्र या शाळा एकतर लांब अंतरावर असतात शिवाय तिथं सुविधाही मिळत नसल्यानं गावातच शाळेची सोय झाल्यास आदिवासी भागातील मुलांचा शैक्षणिक टक्का वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे.