लस नाकाराल, रेशनला मुकाल, सरकारच्या या योजनेचा फायदा मिळणार नाही
राज्यात लवकरच लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न? हा नेमका काय पाहा व्हिडीओ
विशाल करोळे, झी 24 तास, औरंगाबाद : तुम्ही जर लसीचा एकही डोस घेतला नसेल तर येत्या काळात तुमची मोठी अडचण होऊ शकते. तुम्हाला पेट्रोल, डिझेल, गॅस तसच रेशनपासून वंचित रहावं लागू शकतं. कारण सरकार लवकरच राज्यात औरंगाबाद पॅटर्न लागू करण्याच्या विचारात आहे.
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या घटत असली तरी अजूनही लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ग्रामीण भागात अनेकजण लस घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळेच आता सरकार संपूर्ण राज्यात लसीकरणाचा औरंगाबाद पॅटर्न राबवण्याच्या विचारात आहे.
नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. औरंगाबादमध्ये लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद असल्यानं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा पॅटर्न राबवला जाणार आहे.
ज्या नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही त्यांना पेट्रोल, डिझेल आणि गॅस अशा जीवनावश्यक वस्तू मिळणार नाहीत. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सुविधा उपलब्ध करुन द्याव्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
भारतात कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी रशिया आणि चीनमध्ये रूग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ झालीय. त्यामुळे तिस-या लाटेचा धोका अद्याप टळलेला नाही. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त लोकांनी लस घेणं आवश्यक आहे. अन्यथा लसीकरण सक्तीचं करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय उरणार नाही.