नागपूर: एखाद्या समाजाला आरक्षण दिले म्हणजे त्यांचा विकास होतोच, ही समजूत चुकीची असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते सोमवारी नागपुरात अखिल माळी समाज महाधिवेशनात बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी काही नेत्यांनी माळी समाजाला राजकारणात अधिक प्रतिनिधित्त्व मिळावे अशी मागणी केली. त्यासाठी माळी समाजाच्या नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी वाटपात प्राधान्य मिळावे, असेही त्यांनी म्हटले. यावर नितीन गडकरी यांनी म्हटले की, प्रत्येक समाजात मागणी असते आम्हाला राजकारणात जागा मिळाली पाहिजे, मंत्रिपद समाजाला मिळाले पाहिजे. पण मी थोडा स्पष्ट बोलतो आणि सांगतो की विशिष्ट समाजातला माणूस मंत्री झाला की, त्याच्या हातून त्याच समाजाचा विकास होईल असे नाही. 


जेव्हा लोक स्वत:च्या कर्तृत्वाने उमेदवारी मिळवण्यात अपयशी ठरतात तेव्हा ते जातीचे कार्ड पुढे करतात. आरक्षण मिळाल्याने सगळा विकास होतो हा समज चुकीचा आहे. कर्तृत्त्वही विकास घडवते. त्यामुळे आपण जे काम करतो त्या कामालाही महत्त्व दिले पाहिजे, असे गडकरी यांनी सांगितले. आमच्या जातीला आरक्षण नाही तेच बरं आहे अन्यथा मी कुठेतरी बाबू झालो असतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 


मात्र, जे शोषित, वंचित, दुर्बल आहेत अशांना आरक्षण मिळालेच पाहिजे. इंदिरा गांधी, जॉर्ज फर्नांडिज, सुषमा स्वराज किंवा वसुंधरा राजे सिंधीया यांनी अरक्षणाविना आपले कर्तृत्व सिद्ध केले याकडेही नितीन गडकरी यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.


आम्ही असे नेते तयार केले पाहिजे जे देशाला विकासाच्या कक्षेत आणेल, राज्याच्या विकासासाठी काम करेल. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची माळी समाजाची मागणी आहे. त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही गडकरींनी दिले.