मयुर निकम, झी २४ तास, बुलडाणा : सुप्रसिद्ध वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर यांचे बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. गेल्यावर्षी त्यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले. कादंबरीला अफलातून नावे देत अस्सल विनोदी लेखनातून सत्यस्थिती मांडणारे लेखक म्हणून ते सुपरिचित आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रयोगशील आणि विडंबन विनोदशैलीत व्यंग अशी बोरकर यांच्या लेखनाची ओळख आहे. ग्रामीण भागाचे चित्रण असलेली त्यांची 'मेड इन इंडिया' ही कादंबरी बरीच गाजली. या कादंबरीवर १९९०मध्ये नागपूर आकाशवाणीत तीन महिने नाटकीय सादरीकरणही करण्यात आले शिवाय  'मेड इन इंडिया' या कादंबरीवर चित्रपटही निघणार होता. त्यांनी काही काळ अकोला मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीही केली. त्यानंतर एका वृत्तपत्रात त्यांनी अनेक वर्षे विनोदी सदरही चालविले. 



'आमदार निवास १७५६' ह्या कादंबरीमध्ये आमदार निवासातील सत्यपरिस्थितीवर लिहिण्यात आलय . '१५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी' या कादंबरीत त्यांनी राष्ट्रीय कार्यक्रम कसा साजरा करण्यात येतो, हे मांडले आहे.  १५ ते २० गझलाही लिहिल्या. १० ते १५ चरित्रात्मक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आणि हे करत असताना त्यांच्या लिखानात मात्र अस्सल वऱ्हाडी भाषाशैलीच प्रभुत्व कायम राहिलं. बोरकर यांनी वृत्तपत्रातूनही आपल लिखाण शाबूत ठेवले. आज गुरुवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर सुटाळा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.