आता औषधंही महागली; दोन दशकांत औषधांच्या किमतीत विक्रमी वाढ
इंधन दरवाढीनंतर औषधांच्या दरातही वाढ झाली आहे.
मुंबई : इंधन दरवाढीचा फटका सामन्यांच्या खिशाला बसला आहे. त्यातच आता रूग्णांना देखील याची झळ लागणार आहे. इंधन दरवाढीनंतर औषधांच्या दरातही वाढ झाली आहे. यामध्ये 15 ते 40 टक्क्यांनी औषधांच्या किमती वाढल्या आहेत.
हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब अशा काही आजारांच्या औषधांच्या किमती 15 ते 40 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे टॉनिक, एन्टिबायोटिक्स औषधांबरोबरच खोकल्याची औषधंही महागली आहेत. त्यामुळे आता अत्यावश्यक औषधं सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर बाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोरोना संकटामुळे औषधं बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि रसायनांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला. या गोष्टींच्या किमतीही दरम्यानच्या काळात 50 टक्क्यांनी वाढल्याने औषधं महागली आहे. गेल्या दोन दशकातली औषधांच्या किमतीतली ही विक्रमी वाढ असल्याचं औषध विक्रेत्यांचं म्हणणं आहे.
कोणत्या औषधांच्या किमतीत किती वाढ?
बीपीची गोळी यापूर्वी दहा गोळ्यांची एक स्ट्रिपची किंमत 172 रूपये होती तर आता 190 झाली आहे.
डायबेटीजच्या गोळ्यांची एक स्ट्रीप 11 रुपये 30 पैसे होती तर आता 18 रुपये 50 पैसे इतकी झाली आहे.
अँटासिडच्या 15 गोळ्यांची किंमत पूर्वी 24 रुपये होती ती आता 37 रुपये झालीये
खोकल्याच्या एका बाटलीची किंमत सहा महिन्यात 40 ते 50 रूपयांनी वाढलीये.
डेटॅालची 105 रुपयांची बाटली आता 116 रुपये झालीये.
कॅल्शियम गोळ्यांच्या किमत 99 रुपयांवरुन 110 रुपयांवर पोहोचलीये.