पुणे : पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात उद्यापासून अर्थात शनिवारपासून विजेवर चालणाऱ्या बस धावणार आहेत. पीएमपीएलच्या ताफ्यात २५ इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. यातील १५ बसची पुण्यात तर १० बसची पिंपरी - चिंचवडमध्ये शनिवार पासून सेवा सुरु होणार आहे. पर्यावरण पूरक या ई-बस आहेत. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ई-बस पुण्यात दाखल झाल्या आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या बस घेण्यात आल्या आहेत. या योजने अंतर्गत एकूण ५०० ई - बस पीएमपीएलच्या ताफ्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात दीडशे बस घेतल्या जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दीडशे बस पैकी २५ बस प्रत्यक्षात दाखल झाल्या आहेत. यास सर्व २५ बस ९ मीटर लांबीच्या आहेत. आणि विशेष म्हणजे या सर्व बस वातानुकूलित आहेत. त्यामुळं ऐन उन्हाळ्यात पीएमपीएल प्रवाशांना या गारेगार प्रवासचा सुखद अनुभव घेता येणार आहे. पुणे आणि पिंपरी - चिंचवडमधील सहा मार्गांवर या ई-बस धावणार आहेत. तर त्यांच्या चार्जिंगसाठी पुण्यातील भेकराई आणि पिंपरी - चिंचवडमधील निगडी आगारात सुविधा निर्माण करण्यात आली आहे.


एकदा चार्ज केल्यानंतर एक बस २२५ किलोमीटर धावू शकते. चार्जिंगसाठी प्रति युनिट आठ रुपये एव्हढा खर्च येतो. ई- बसमुळे डिझेलचा वाढता खर्च कमी होणार आहेच. पण त्याचबरोबर शहरातील प्रदूषण देखील कमी होणार आहे. एवढे सर्व असूनही नेहमीच्या बसपेक्षा तिकीट दर कमी असणार आहे. आता या ई-बस तरी किमान पीएमपीएलचा प्रवास सुखकर करतील अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.