अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : आपल्या गाडीतलं पेट्रोल संपलं, तर आपल्यासमोर थेट पेट्रोलपंप गाठण्याशिवाय पर्याय नसतो. पण जर त्यासाठी पेट्रोलपंप आपल्या दारी आला तर? आश्चर्य वाटेल पण याची सुरुवात झालीय. हा असा पेट्रोलपंप आपण पहिल्यांदाच पाहिला असेल. कारण देशात पहिल्यांदाच आणि तीही फक्त पुण्यात ही सुविधा उपलब्ध झाली आहे. फ्युअल ॲट डोअरस्टेप म्हणजे एक प्रकारचा हा मोबाईल पेट्रोलपंप आहे. एका ट्रकवर इंधनाची टाकी आणि डिस्पेन्सर बसवण्यात आलाय. त्याला जीपीएस बसवण्यात आलं आहे. 


फिरता पेट्रोलपंप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तळेगाव - चाकण रस्त्यावर खराबेवाडीत हा फिरता पेट्रोलपंप उभा असतो. जिथून कुठून ऑर्डर येईल तिथे हा पेट्रोलपंप चालू लागतो. सध्या केवळ जेनसेट , डीजीसेट किंवा टॉवर्ससाठीच्या इंधनाचा पुरवठा याद्वारे करण्यात येतोय. सुरवातीला विशिष्ट ग्राहकांनांच या सेवेचा लाभ मिळणार आहे. इंडियन ऑईल ही सुविधा देत आहे.


घरपोच डिलिव्हरी 


यापूर्वी कुणाला इंधन हवं असल्यास बॅरल किंवा कॅनमधून ते घेऊन जावं लागत असे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ते धोकादायक होतं. आता मात्र प्रशिक्षित कर्मचारी अतिशय सुरक्षित पद्धतीनं इंधनाची वाहतूक आणि पुरवठा करणार आहेत. सेफ्टी टॅग मॅच झाल्याशिवाय इंधनाची डिलिव्हरी होऊच शकत नाही. त्यामुळे ग्राहकांचीदेखील अनेक अडचणींतून मुक्तता झाली आहे. 


खरंतर हल्ली घरपोच डिलिव्हरी हा प्रकार नवीन राहिलेला नाही. लवकरच देशातल्या इतर शहरांतदेखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे. ती वैयक्तिक वापराच्या इंधनापर्यंत कधी पोहोचते याबद्दल उत्सुकता आहे.