आता राजभवनातूनही होणार वीजनिर्मीती
पुण्याच्या राजभवनातील सोलर पॅनल... यातून तब्बल एक मेगावॅट म्हणजे जवळपास साडे सोळा लाख युनिट विजेची निर्मिती होणार आहे. यातून पुण्यातीलच नाही तर, मुंबई आणि नागपूर येथील राजभवनाच्या विजेची गरज भागेल एवढी वीजनिर्मीती होऊ शकते.
नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुण्याच्या राजभवनातील सोलर पॅनल... यातून तब्बल एक मेगावॅट म्हणजे जवळपास साडे सोळा लाख युनिट विजेची निर्मिती होणार आहे. यातून पुण्यातीलच नाही तर, मुंबई आणि नागपूर येथील राजभवनाच्या विजेची गरज भागेल एवढी वीजनिर्मीती होऊ शकते.
राज्यपालांचे होते बारीक लक्ष
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या पुढाकारातून वर्षभरापूर्वी हा प्रकल्प सुरु झाला. आणि वर्षभरात पूर्णही झाला. स्वतः राज्यपालांचं या प्रकल्पावर लक्ष होतं. तीनही राजभवनासाठी ९ लाख युनिट वीज लागते. या ठिकाणी सोळा लाख युनिट वीज निर्मिती होणार आहे. म्हणजे, ८ लाख युनिट ग्रीन एनर्जी इतरांना वापरायला मिळणार आहे.
सौर ऊर्जेसाठी ३५०० पॅनल
पुण्यातील राजभवनात सौर ऊर्जेसाठी ३५०० पॅनल बसवण्यात आलेत. त्यासाठी ८ कोटी रुपये खर्च झालेत. या उपक्रमाचं अनुकरण राज्य सरकारही करणार आहे. राज्यात १४ हजार चारशे मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचं लक्ष ठेवण्यात
आलं आहे.
पर्यावरणस्नेही वीजनिर्मीती उपक्रम
सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जेची निर्मिती सर्वच जण करू शकत नाहीत. मात्र वीज काटकसर, वीजबचत या मार्गांनीही पर्यावरण रक्षण करता येणं शक्य आहे. मात्र जिथे जिथे सौर उर्जा निर्मिती शक्य आहे तिथे हे प्रयोग करायला काहीच हरकत नाही. राजभवनापासून त्याची सुरूवात झालीच आहे.