मुंबई : 26 वर्षीय एका नर्स तरूणीने प्रियकराने लग्नास नकार दिल्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. बीडमधील रूग्णालयात काम करणारी सोनाली अंकुश जाधव असं या तरूणीचं नाव. सोनाली हिचा मांजरसुंबा घाट परिसरात एका झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत मृतदेह आढळला. सोनालीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनाली जाधव ही पालवन चौकात राहत होती. ती दिप हॉस्पीटलमध्ये नर्स म्हणून कामाला होती. सोनाली आणि एका खासगी लॅबमध्ये काम करणाऱ्या 27 वर्षीय अक्षय राजाभाऊ आव्हाड यांच्यात प्रेमसंबंध होते. अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध असल्याने सोनाली हिने अक्षयला लग्न करण्याची मागणी केली.


आधी लग्नाची बाब अक्षय याने टाळली. मात्र, सोनाली हिचा लग्नासाठी जास्तच रेटा वाढल्याने अक्षयने लग्नास नकार दिला. अक्षयने लग्नास नकार दिल्याच्या राग मनात धरून सोनाली जाधव हिने मांजरसुंभा घाटातील पालीजवळ असलेल्या एका झाडाला गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे.


या प्रकरणी मृत सोनाली जाधव हिचा भाऊ अजय जाधव याने अक्षय आव्हाड याच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रेमप्रकरणातून या तरूणीने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं आहे.