नागपूरः पाणीपुरी (Panipuri) खाणे एका विद्यार्थीच्या जीवावर बेतल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. जम्मू कश्मीर (Jammu Kashmir) येथून बीएससी नर्सिंगच्या शिक्षणासाठी आलेल्या 18 वर्षे विद्यार्थिनीचा नागपूर मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शितल कुमार असं विद्यार्थिनीचे नाव आहे. प्राथमिक अंदाजानुसार या मुलीचा मृत्यू पाणीपुरी खाल्ल्यामुळे झाला आहे. पाणीपुरीसाठी करण्यात आलेल्या पाणी दुषित असल्याने तिला गॅस्ट्रोची लागण झाल्याने तसेच योग्य वेळी उपचार न घेतल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदनाच्या अहवालातुन मृत्यूच कारण स्पष्ट होईल. तसेच तिच्यासह आणखी दोन मैत्रिणींवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती नागपूर मेडिकल कॉलेजचे तथा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी दिली आहे. (Nagpur Panipuri News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शितल कुमार ही 18 वर्षाची विद्यार्थिनी आहे. 3 जुलै रोजी तिच्या दोन मैत्रीणीसोबत ती पाणीपुरी खायला गेली होती. त्यानंतर तिची प्रकृती बिघडली. 4 जुलै रोजी ती डॉक्टरांकडे गेली असता तिला रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला. पण शीतलने औषधी द्या ती मी घरीच घेते असा हट्ट धरला. मात्र हाच हट्ट तिच्या जीवावर बेतला. औषध घेतल्यानंतरही दिवसभरात तिची प्रकृती खालावली होती. 5 जुलै रोजी जेव्हा ती रुग्णालयात आली त्यावेळेस तिची प्रकृती फारच बिघडलेली होती. त्यावेळी तिला रुग्णालयात रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं. पण रात्री व्हेंटिलेटरवर ठेवून सुद्धा तिच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही. याउलट तिची प्रकृती प्रचंड खालावल्याने शीतलचा मृत्यू झाला. सध्या तिच्या दोन मैत्रिणींवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती नागपूर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता राज गजभिये यांनी दिली आहे. 


प्राथमिक माहितीनुसार, शितलसह तिच्या अन्य दोन मैत्रिणींना गॅस्ट्रोचीच लागण झाल्याचं लक्षणावरून दिसत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांनी खाल्लेल्या पाणीपुरीत वापरण्यात आलेले जिन्नस हे दूषित असावे. आणि त्यामुळेच तिघींनाही गॅस्ट्रोची लागण झाली असावी असा अंदाज लावला जात आहे. यातच योग्य वेळी उपचारासाठी शीतलने दवाखान्यात न जाता दुर्लक्ष केले. त्यामुळं तिच्यावर जीव गमावण्याची वेळ आली आहे. सध्या तिच्या दोन मैत्रीणींवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याच सांगितलं जातं आहे.


दरम्यान, शीतलच्या अन्य दोन मैत्रिणींची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांनी कोणाकडून पाणीपुरी घेतली होती त्या विक्रेत्याचा शोध घेता येणार आहे. मात्र अद्याप तरी याबाबत कुठलीही तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांकडून आलेली नाही. त्यामुळे त्यांना तक्रार करायची असल्यास ती पोलिसात करावी लागेल. तसंच, मेडिकल कॉलेजच्या आवारात असे खाद्यपदार्थांची विक्री केली जात नाही. हे पदार्थ बाहेर विकले जात असून मुलींनी हे बाहेर जाऊनच खाल्ले असावे, असंही डॉ. राज गजभिये यांनी सांगितलं.