COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : एकीकडे मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला असताना आता ओबीसी समाज शासनातील ओबीसी समाजाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी आक्रमक होणार आहे. ओबीसी समाजाची एकही जागा इतर समाजाला देणार नाही अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. आता याच्या पाठपुराव्यासाठी ओबीसी समाज आक्रमक होणार आहे. 


मुख्यमंत्र्यांची घोषणा


 मराठा आंदोलनाच्या दबावानंतर राज्य सरकारने जाहीर केलेल्या ७२ हजारांच्या मेगा भरतीला स्थगिती दिली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत ७२ हजार पदांची भरती केली जाणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी नुकतीच जाहीर केली. या स्थगितीमुळे इतर समाजामध्ये नाराजीचा सूर आहे. ही नाराजी असतानाच मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारमधील ओबीसी समाजाचा अनुशेष भरण्याची घोषणा केली. सध्या राज्य सरकारमध्ये ओबीसींच्या ९२ हजार जागा भरल्या गेल्या आहेत, तर १ लाख १० हजार पदांचा अनुशेष आहे. 
 
 अनुशेष भरण्याची घोषणा
 मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर १५ दिवसांत यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन ओबीसी अनुशेष भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी ओबीसी संघटनांनी केलीय. तर दुसरीकडे ओबीसींचा अनुशेष भरल्याशिवाय राज्य शासनाने नवी भरती करू नये अशी भूमिका ओबीसी संघटनांनी घेतलीय.
एकीकडे मराठा समाजाच्या आंदोलनामुळे मेगा भरतीला स्थगिती दिल्यानंतर नाराज झालेल्या ओबीसी समाजाला खूष करण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाच्या नोकरीतील ओबीसींचा अनुशेष भरण्याची घोषणा केली. मात्र या घोषणेमुळे आता ओबीसी समाज आक्रमक होणार असून दुसरीकडे मराठा समाजही या घोषणेमुळे नाराज होण्याची चिन्हं आहेत.