अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यातून तडकाफडकी बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांच्याबरोबरच आणखी एका अधिकाऱ्याच्या बदलीची चर्चा सध्या पुण्यात सुरु आहे. त्या म्हणजे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार. मुंढे प्रमाणे त्यादेखील कर्तव्य कठोर अधिकारी म्हणून प्रसिद्ध होत्या. मात्र स्वार्थाच्या राजकारणानं त्यांचा बळी घेण्यात आलाय. 


महापालिकेच्या वर्तुळात दबदबा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंढेंप्रमाणे बहुचर्चित नसल्या तरी प्रेरणा देशभ्रतार यांचा महापालिकेच्या वर्तुळात दबदबा होता. एक शिस्तप्रिय तसंच कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्या परिचित होत्या. नियमबाह्य तसंच बेकायदा गोष्टी रोखण्यासाठी कुठलाही आणि कुणाशीही वाद ओढवून घेण्याची त्यांची तयारी असायची.  त्यात त्या कधी मागे हटल्या नाहीत. विरोधक असो वा सत्ताधारी त्यांनी कधी कुणाला जुमानलं नाही. कदाचित या सगळ्याची पावती म्हणूनच की काय त्यांना पुणे महापालिकेतून हटवण्यात आलंय. मुंबईमध्ये सामाजिक न्याय विभागात त्यांची बदली करण्यात आलीय. तुकाराम मुंढेप्रमाणेच प्रेरणा देशभ्रतार यांच्या बदलीविषयी पुणेकर नाराजी व्यक्त करत आहेत. 


बोगस कर्मचाऱ्यांवर कारवाई 


प्रेरणा देशभ्रतार यांची २२ महिन्यांची कारकीर्द खरोखरच लक्षवेधी ठरली. पुण्यातील प्रस्तावित २४ X ७ पाणीयोजनेचा खर्च ५०० कोटींनी कमी त्यांच्यामुळेच झाला. महापालिकेतील बोगस कर्मचाऱ्यांवर त्यांनी कारवाई केली. तसेच त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांनाही चांगलंच खडसावलं. महापालिकेचं नुकसान करून कंत्राटदारांचा गल्ला भरणाऱ्या होर्डिंग पॉलिसीवर त्यांनी आक्षेप घेतला. महापालिकेतील अंतर्गत बदल्यांना त्यांनी शिस्त लावली. 


ही यादी बरीच मोठी आहे. त्यांच्या या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे महापालिकेतील कारभाऱ्यांच्या हितसंबंधांना बाधा येत होती. त्यातूनच वेळोवेळी त्यांच्या बदलीची मागणी पुढे येत होती. शिवसृष्टीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईत झालेल्या बैठकीची संधी या कारभाऱ्यांनी साधली आणि प्रेरणा देशभ्रतार याना मुंबईचा रस्ता दाखवल्याचं बोललं जातंय.