Buldhana Rapid Hair Loss: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील तीन गावातील नागरिकांचे केस अचानक गळायला लागले त्यानंतर तीनच दिवसांत त्यांना टक्कल पडत असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. या विचित्र प्रकारामुळं तीन गावात जवळपास शंभर लोकांना फटका बसला होता. या प्रकरणाची आरोग्य विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. आता आरोग्य विभागाने अहवाल सादर केला आहे. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट हाती येत आहे. जिल्ह्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावांतील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क तीन दिवसांतच संपूर्ण टक्कल पडत असल्याचे लक्षात आले होते. सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वक्षण सुरू केले आहे. 


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. तर पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली असल्याचं या पाण्याच्या तपासणीत उघड झालं आहे. गावकऱ्यांसाठी हे पाणी वापरणं विष ठरतंय. 


खारपाण पट्ट्यातील या गावात पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय केलेली आहे. मात्र वापरण्याच्या पाण्यात नायट्रेटसारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य देखील नसल्याचं धक्कादायक वात्सव समोर आल आहे. पाणी तपासणीचा अहवाल झी 24 तासच्या हाती लागला आहे. नायट्रेटमुळे अत्यंत गंभीर आजार जडू शकतात. 


टीडीएस लेव्हल आणि नायट्रेटची मात्रा 50 पेक्षा जास्त आहे. बोअरच्या पाण्याचे हे नमुने घेण्यात आले आहेत. ज्या नागरिकांना केस गळती व टक्कल पडले आहे त्यांच्या घराजवळील बोअरच्या पाण्याचे परिक्षण करण्यात आले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. आरोग्य विभागाने बाधित नागरिकांच्या त्वचेचे नमुनेदेखील घेतले आहेत. त्याचा रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे. 


एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंडगावात सर्वेक्षण केले. त्यामध्ये केसगळतीच्या आजाराने 30 जण बाधित असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याबाबत पुढील उपाययोजना आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. मात्र, बाधित रुग्णांची संख्या अधिक असून शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.