पावसाळी अधिवेशनात ओला टॅक्सींचा वापर
४ जुलैपासून नागपुरात पावसाळी अधिवेशन
नागपूर : नागपुरात ४ जुलैपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रथमच ओला टॅक्सींचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाने ओला कॅबसोबत करार करण्यात आलाय. त्यासाठी १०० इलेक्ट्रीक आणि १०० पेट्रोल डिझेल अशा २०० कॅब पुरवल्या जाणार आहेत. दरवर्षी नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी अनेक जिल्ह्यातून वाहनं मागवली जातात. मात्र यावर्षी पावसाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे.
पावसाळा लक्षात घेता यावेळी शासकीय वाहनं अधिग्रहीत करणं टाळलंय. इलेक्ट्रीक ओला कॅबचं चार्जिंग स्टेशन नागपुरात अनेक जागी उपलब्ध आहे. बाहेरील जिल्ह्यातून मागवण्यात येणाऱ्या वाहनांच्या चालकांचा दैनिक भत्ता व इंधनाचा खर्च यामुळे वाचणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. तसेच इलेक्ट्रिक कार चा वापर करून शहरात होणाऱ्या प्रदूषणात थोडा का होईना आळा बसणार असल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आलाय.
ओला कॅब व्यतिरिक्त भाडे तत्वावर ४०० खाजगी वाहनांची व्यवस्था देखील प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अधिवेशना काळात १०-१२ दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने शेड उभारणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.