राणा यांच्या भाजप प्रवेशावर शिवसेनेची टीका; स्थानिक पातळीवर संघर्षाची चिन्हे
ज्या शरद पवारांनी त्यांना मोठमोठी पदे दिली त्यांचेही होऊ शकले नाहीत.
विशाल करोळे, झी मीडिया, उस्मानाबाद: राणा जगजितसिंह पाटील यांच्या भाजपा प्रवेशाला उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कडाडून विरोध केला आहे. ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील यांचे वैर सर्वश्रुत आहे. राणा जगजितसिंह पाटील कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांना माझा कायम विरोध राहील, असे ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
राणा जगजितसिंह पाटील यांचे कुटुंबीय सामान्य जनतेच्या विश्वासाला जागले नाहीत. ज्या शरद पवारांनी त्यांना मोठमोठी पदे दिली त्यांचेही होऊ शकले नाहीत. याचा भाजपच्या नेत्यांनी याचा विचार करावा, असे ओमराजेंनी म्हटले. राणा जगजितसिंह यांचे राजकारण इथले मतदार संपवणार आणि मीही संपवणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे राणा जगजितसिंह पाटील यांची भाजपमधील आगामी वाटचाल खडतर मानली जात आहे. तसेच स्थानिक पातळीवर यावरून आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपमध्ये यावरून आता वाद पेटण्याची सुद्धा चिन्ह निर्माण झाली आहेत. आता हा वाद शिवसेना भाजपचे वरिष्ठ नेते कसा सोडवतात यावर बरंच काही अवलंबून असेल.
कळंब उस्मानाबाद मतदारसंघाचे आमदार आणि माजी गृहमंत्री व शरद पवार यांचे जुने सहकारी पदमसिंह पाटील यांचे सुपूत्र राणा जगजितसिंह पाटील यांनी शनिवारी भाजप प्रवेशाचा निर्णय जाहीर केला होता. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काळजावर दगड ठेवून भाजपमध्ये जात असल्याचे त्यांनी म्हटले होते.