दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पुणे- नाशिककरांसाठी आनंदाची बातमी
बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरु
मुंबई : सर्वत्र दिवाळीची धूम असतानाच आता प्रवासवेड्या मंडळींसाठी, विशेष म्हणजे नाशिक आणि पुणेच्या दिशेने जाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही आनंदवार्ता म्हणजे, नाशिक - पुणे ही बंद पडलेली विमानसेवा पुन्हा एकदा दिवाळीच्या निमित्ताने रविवारपासून सुरु होत आहे.
अलायन्स एअर ही कंपनी ७० आसनी विमानाच्या माध्यमातून ही सेवा पुरवणार आहे. मात्र याआधी सुरू झालेली नाशिक दिल्ली आणि नाशिक बंगळुरू ही सेवा फारशी सुरळीत नाही हेसुद्धा खरं. नाशिक दिल्ली विमानसेवेचा तर गाशा गुंडाळावा लागला होता. दोन वर्षांपूर्वी नाशिक पुणे विमानसेवा एअर डेक्कन या कंपनीने सुरू केली होती. तीसुद्धा काही तांत्रिक कारणाने बंद झाली होती. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नाशिक पुणे सेवा सुरू करण्याचा घाट घातला जातो आहे.
एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या अलायन्स एअरद्वारे येत्या २७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नाशिक-पुणे विमानसेवेचे तिकीट बुकिंग काही दिवसांपूर्वी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी हे बुकिंग सुरू करण्यात आल्याचं कळत आहे. ही विमानसेवा म्हणजे नाशिक आणि पुणेकरांसाठी अनोखी भेटच ठरत आहे.