मुंबई : Coronavirus कोरोना व्हायरसचा देशातील वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची हाक दिली. ज्यानंतर बहुतांश व्यवहार ठप्प झाले. या काळात सर्वच स्तरातील नागरिकांना काही अडचणींचाही सामना करावा लागला. पण, कोरोनावर मात करण्यासाठी साऱ्यांनीच या निर्णयाचं स्वागत केलं. पण, एक वर्ग असाही होता, जो त्यांच्या स्वत:च्या कुटुंबापासून दूर होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणून मुंबई आणि देशाच्या इतर भागांमध्ये असणाऱ्या स्थलांतरित मजुरांचा हा वर्ग. अशा सर्वच मजुरांना आता आपआपल्या राज्यांत, आपल्या गावी पोहोचण्याच्या वाटा मोकळ्या होऊ लागल्या आहेत. प्रशासकीय यंत्रणा आणि रेल्वे विभागाच्या प्रयत्नांनी हे साध्य होत आहे. नाशिक येथून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या दिनेशे मोठ्या संख्येने रेल्वेद्वारे मजुर रवानमा झाल्यानंतर आता भिवंडी स्थानकातूनही एक हजारहून अधिक मजुरांना घेऊन एक रेल्वे गोरखपूर दिशेने रवाना झाली आहे. 


मध्य रेल्वे आणि राज्य सरकारच्या विनंतीनंतर स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणारी विशेष ट्रेन मध्य रेल्वे मार्गावर चालवण्यात आली. मध्य रात्री १ वाजता भिवंडी रेल्वे स्थानकातून गोरखपूरकडे ही ट्रेन रवाना करण्यात आली. त्यामध्ये ११०४ मजूर होते. लॉकडाउन संदर्भातील सर्व नियमांचं पालन करत मजुरांचा हा प्रवास सुरु झाला. सोशल मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडिओसुद्धा पोस्ट करण्यात आला. 



 


कोरोना व्हायरसची वाढती दहशत पाहता लॉकडाऊनचा सातत्याने वाढणारा कालावधी हा स्थलांतरित मजुरांसाठी आव्हानं उभी करत होता. उदरनिर्वाहासोबतच दाटीवाटीच्या ठिकाणी राहत असल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचंही वातावरण होतं. परिणामी अनेक मजुरांनी आपल्या राज्यांत जाण्यासाठी प्रशासनाकडे मदतीचा हात मागितला होता. याच धर्तीवर आता प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे.