ठाणे : आईच्या कुशीत झोपलेल्या दीड वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या महिलेसह तिच्या अल्पवयीन साथिदाराला कोपरी पोलिसांनी बारा तासांतच अटक केली. अपहरणकर्त्याची एक महिला साथीदार अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. अपहरणाची ही घटना गुरुवारी ठाणे रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक १०च्या बाहेरील वाहन तळाजवळ घडली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे अल्पवयीन आरोपीला अटक केली. त्याच्या चौकशीत शाहिस्ता शेख या महिलेचं नाव पुढे आले आहे. त्यानंतर पोलिसांनी शाहिस्ताला अटक केली असून तिच्या नातेवाईकांकडून चिमुकलीची सुटका केली. शाहिस्ता ही मुळची गोवंडीची रहाणारी आहे. तिनं हे अपहरण का केले याचा तपास पोलीस करत आहेत. 


पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रेल्वे स्टेशनचे सीसी टीव्ही फुटेज आणि इतर कचरावेचकांकडे चौकशी सुरु केली. त्यानुसार, १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने झोपी गेलेल्या लहानग्या पूजाला उचलून नेल्याचे कळताच तपासाची चक्रे फिरली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर आणि पोलीस निरीक्षक दत्ता गावडे आदींच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक सकपाळे आणि शिंदे आदींनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे विकी नामक बालकाला ताब्यात घेतले.


त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर अपहरणकर्ती शाहिस्ता शेख (३०) रा.वर्तकनगर हिचा छडा लावला. तसेच,तिच्या नातेवाईकाकडे लपवून ठेवलेल्या मुलीची सुखरूप सुटका करून बाळाला मातेच्या स्वाधीन केले. घरकाम करणारी आरोपी महिला शाहिस्ता ही  विवाहित आहे.