महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात लक्षवेधी निकाल! महायुती सुसाट, महाविकासआघाडी भुईसपाट
महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं चांगली कामगिरी केल्यानं विधानसभेची लढत चुरशीची होईल असं वाटत होतं. मात्र,महायुतीनं लोकसभेतील चुका टाळत अजस्त्र असा विजय मिळवलाय.
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात लक्षवेधी निकाल यावेळी पाहायला मिळाले. भाजपप्रणित महायुतीनं रेकॉर्डब्रेक जागा जिंकल्या. गेल्या 30 वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका पक्षाचे सव्वाशेपेक्षा जास्त आमदार निवडून आले नव्हते. यावेळी मात्र भाजपनं ती किमया साधलीय. एवढंच नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीनंही उत्कृष्ठा कामगिरी करत महायुतीची गोळाबेरीज सव्वा दोनशेच्यावर नेऊन ठेवलीय. जनतेनं मतदानरुपी दिलेल्या आशीर्वादानं खुद्द फडणवीसही चकीत झाल्याचं दिसले.
हे देखील वाचा... शॉकिंग निकाल ! 65 टक्के मुस्लीम मतदार, विरोधात 11 मुस्लीम उमेदवार, तरीही प्रचंड मतांनी कसा बनला भाजपचा आमदार?
महायुतीच्या विजयामागं अनेक फॅक्टर असल्याचं पाहायला मिळालं. लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है या घोषणा मतदारांना भावल्या असल्याचे दिसते. सामाजिक समीकरणं पाहून उमेदवारांची निवड करण्यात आली. महायुतीच्या प्रचारात कमालीचा समन्वय पाहायला मिळाला. सरकारच्या बाजूनं सुप्त लाट विरोधकांना समजलीच नाही. उद्धव ठाकरेही या पराभवानं आश्चर्यचकीत झाल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछेहाट झाली होती. त्यातून खचून न जाता महायुतीनं विधानसभेसाठी नवी रणनिती आखली दुसरीकडं लोकसभेला मिळालेल्या थोड्याफार यशानं हुरळून गेलेली मविआ गाफील राहिली. परिणामी महायुतीला अजस्त्र, असामान्य असं बहुमत मिळालंय.
संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीनं दणदणीत विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला अक्षरशः लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 227 जागा महायुतीनं जिंकल्या. यामध्ये एकट्या भाजपनं सर्वात जास्त 131 जागा जिंकत आपण मोठा भाऊ असल्याचं सिद्ध केलं. तर शिवसेनेनं 55 जागांवर विजय मिळवला. त्याचवेळी राष्ट्रवादीनं 41 जागांवर आपला झेंडा फडकवला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला अवघ्या 48 जागांवर समाधान मानावं लागलं. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 21 जागा जिंकल्या. तर काँग्रेसला वाट्याला 17 जागा आल्या आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा जिंकता आल्या. तर एकदा हाती सत्ता द्या असं आवाहन करणा-या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा जिंकता आली नाही. तर सत्तेत सहभागी होऊ असा दावा करणारे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला त्यांचा एकही उमदेवार जिंकून आणता आला नाही.