पुणे : एक गाव, एक शाळा, एक शिक्षक आणि फक्त एकच विद्यार्थी. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरंय. या एका विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी त्याचे शिक्षक दररोज चक्क १३० किलोमीटरचा अवघड प्रवास करतात. पुणे जिल्ह्यातील चांदर गावातल्या शिक्षण व्यवस्थेचा हा लक्षवेधी रिपोर्ट. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथून पुढची अवस्था आणखीच वाईट आहे. चारचाकी जागेवर उभी करून पुढे चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. पानशेत रस्ता सोडल्यानंतर शिरकोली - माणगावच्या दिशेनं प्रवास सुरु होतो. धरणाच्या कडेनं नागमोडी वळणं घेत आपण माणगावपर्यंत पोचतो. पानशेत धरणाचं हे शेवटचं टोक म्हणजे जणूकाही जगच संपल्याची अनुभूती. चांदरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरणाचं काम सध्या सुरु आहे. अवघे काहीशे मीटर पूर्ण झालेला हा खडीचा रस्ता सोडल्यांनंतर चांदरसाठीची थरारक वाटचाल सुरु होते. कशीबशी मजल दरमजल करत आम्ही इथवर पोचलो. मात्र एक प्राणी असा आहे  की, जो रोजच एवढ्या खस्ता खाऊन चांदरला पोहोचतो.


 त्यांचं नाव रजनीकांत मेंढे. तिशीतले रजनीकांत चांदर गावातील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहेत. गावात कुठलंच मोठं वाहन पोहचू शकत नाही. त्यामुळं शाळेत जाण्यायेण्यासाठी रजनीकांत दुचाकीचा वापर करतात. इथला कच्चा रस्ता, डोंगरदऱ्या, घनदाट वनराई , जंगली प्राण्याची भीती अशा सगळ्याच गोष्टी अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. 


पावसाळ्यात तर काय हाल होत असतील याची केवळ कल्पनाच केलेली बरी... खानापुरात वास्तव्याला असलेले रजनीकांत दररोज दोन ते अडीच तासांचा प्रवास करून चांदरच्या शाळेत पोचतात. एकच खोली असलेली ही शाळा... शाळेत पोहोचल्यावर त्यांचं पहिलं काम असतं ते म्हणजे शाळेतल्या एकुलत्या एका विद्यार्थ्याला हुडकून काढायचं... या विद्यार्थ्यांचं नाव युवराज.... म्हणजे त्याच्या स्टेटसला अगदी साजेसंच.... गावभर हुंदडत असलेल्या युवराजांचं शाळेत आगमन झालं की, त्यादिवसाची शाळा भरते.



हे सगळं करत असताना रजनीकांत गुरुजींचा उत्साह आणि जिद्द कशी टिकून राहत असेल हेच एक मोठं आश्चर्य आहे. शाळेच्या खोलीत विविध प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची जुळवाजुळव त्यांनी केलीय.  अगदी टीव्हीवर शैक्षणिक फिल्म्स दाखवून शिक्षणात रंजकता आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यापूर्वी शाळेचा पट १५ /१६ पर्यंत होता. मात्र शाळा चौथीपर्यंतच असल्यानं आधीची मुलं एकतर दुस-या गावी शिकायला गेली किंवा शाळाबाह्य झाली. आता विद्यार्थी वयोगटात बसणारा युवराज एकटाच आहे. त्याची इयत्ता दुसरी. स्वतःचं नाव लिहून बेरीज वजाबाकी करण्याइतपत त्याची प्रगती आहे. 


रजनीकांत गुरुजी आपल्या कामात किंबहुना कर्तव्यात कसूर करत नाहीत. एक विद्यार्थी शाळा चालवताना अनेक मर्यादा पडतात. एका विद्यार्थ्याला शेअरिंग आणि केअरिंग कसं शिकवायचं असा प्रश्न त्यांना पडतो. विद्यार्थी संख्या पुरेशी नाही म्हणून शाळा बंद करणंही त्यांना मान्य नाही. शाळा बंद झाल्यास गावातील मुलं शिक्षणाला कायमस्वरूपी मुकतील अशी त्यांची भावना आहे. अर्थात त्यांनी निवासी शाळेचा पर्यायदेखील सुचवलाय. 


गेली 8 वर्षं चांदरच्या शाळेशी त्यांचा ऋणानुबंध जुळलाय. एवढे हाल होत असतानाही त्यांनी आजवर कधी तक्रार केली नाही. मात्र आता थोडा बदल हवा अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांची अपेक्षा पूर्ण करायची की नाही, याचा निर्णय अर्थातच घ्यायचाय तो मायबाप सरकारला.. तोवर राजनीकांतची युवराजांसाठीची ही शाळा सुरूच राहणार आहे.