नाशिक, अहमदनगर : कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली. या कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत. उमराणेमध्ये कांदा लिलाव बंद पाडण्यात आला आहे. तर मुंबई-आग्रा महामार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको केला आहे. तसेच नाशिकमधील लासलगावातही कांदा लिलाव अद्याप बंद तर शिरुरमध्येही कांदा पडून आहे.


कांद्याचे भाव कोसळले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक जिल्ह्यातला शेतकरी संतप्त झाले असून लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव अद्यापही बंदच आहे. नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनच्या निर्णयानंतर कांदा लिलाव सुरू होण्याची शक्यता, वर्तवली जात आहे. ६०० वाहनातून आणलेला कांदा अद्यापही लिलावाच्या प्रतीक्षेत आहे. तर उमराणे येथे कांदा लिलाव बंद पाडला असून मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला तर उमराणा, सटाणा आणि नामपूर येत शेतकऱ्यांनी रास्तारोको सुरु केला असून कांदा निर्यातबंदीचे आंदोलन चिघळणार, असे दिसत आहे.



आधीच कोरोनाच्या संकटाने हतबल झालेल्या बळीराजा शेतकऱ्याच्या चिंता आता पुन्हा वाढल्या असून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. तीव्र संताप व्यक्त होत आहे.



दरम्यान, मोदी सरकारने पुन्हा शेतकऱ्यावर छातीवर तलवार चालवून त्याला रक्तबंबाळ केले, अशी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी टीका केली आहे. केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी उठवलेली काद्यावरील निर्यात बंदी आता पुन्हा लागू केली. त्यामुळे लाखो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे, असे ते म्हणालेत.


कांद्याच्या निर्यातबंदीचं काही कारण नव्हतं, कांदा हा जीवनावश्यक वस्तूमधून काढला होता. कांदा नाही खाल्ला तर कुणी मरत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करायला पाहिजे होता अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी व्यक्त केलीय.
 
कांदा निर्यातीवर बंदी संदर्भात केंद्र सरकारनं विचारपूर्वक निर्णय घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलीय. शरद पवार यांनी याबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे आणि डॉ. भारती पवार देखील शरद पवार यांच्यासोबत गोयल यांच्या भेटीला गेले होते.