नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव सहा ते सात हजारावर आले आहेत. असे असताना कांद्याची राजधानी असलेल्या या नाशिक शहरात कांद्याचे आणि सफरचंदाचे भाव समसमान आहेत. कांदा किरकोळ बाजारात कांदा शंभऱ रूपयांवर गेला आहे. जवळपास तेवढाच भाव सफरचंदालाही आहे. सध्या कांद्याचे भाव चढे असले तरी त्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होताना दिसत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. शेतकऱ्याकडं कांदाच नसल्यानं बाजारात कितीही भाव वाढला तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. तर दुसरीकडे मुंबई-पुण्यात टोमॅटोचे दर कमी झाले आहेत.


मुंबई-पुण्यात टोमॅटोला २० ते २५ रुपये किलो असा भाव मिळत आहे. तर नाशिक जिल्ह्यात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मात्र चार ते पाच रुपये किलोने टोमॅटो विकावा लागत आहे. २० किलोच्या जाळीला ऐंशी ते दीडशे रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.  


अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि आता  ढगाळ वातावरणाने टोमॅटोचं उत्पादन एकरी सरासरी २५ ते ३० टक्क्यांनी घसरले आहे. त्यातच कमी भाव मिळत असल्याने शेतकरी चांगलाच धास्तावला आहे. दरम्यान गुजरात बंगलोर, राजस्थान या भागात टोमॅटोची आवक सुरू झाल्याने हे भाव अजून खाली येण्याची शक्यता आहे.