नाशिक : लिलाव सुरू झाल्यावर कांद्याचे भाव पुन्हा कोसळले आहेत. लासलगाव बाजार समितीत १४२ वाहनातून १५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. त्याला जास्तीत जास्त ५९१२ रूपये, तर सरासरी ५१०० रूपये दर मिळाला. जवळपास दीड हजार रूपयांनी कांद्याचे भाव कोसळले. त्यामुळे लिलाव सुरू होऊनही कांदा उत्पादकाला न्याय मिळालेलाच नाही. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी  संघटनेच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आपल्या अडचणी मुख्यमंत्र्यासमोर मांडल्या. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे तसेच लासलगाव मर्चंटस असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.


 केंद्र शासनाने २३ ऑक्टोबर २०२० रोजी जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ०३ अन्वये आदेश काढून कांद्याचा जीवनावश्यक सूचित समावेश केला आहे तसेच या अंतर्गत घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टनांपर्यंत तर किरकोळ व्यापारी वर्गाला फक्त दोन टनांपर्यंत कांदा साठवणुकीचे निर्बंध घातले आहेत. त्यामुळे राज्यात व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी बंद केली होती. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. 


या पार्श्वभूमीवर काल कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी संघटनाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली व आपापल्या अडचणी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या.  मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी संघटनानी उद्यापासून कांदा खरेदी सुरू करण्याचे आश्वासन दिले. देशात उत्पादित होणाऱ्या कांद्यापैकी ६० टक्के कांदा महाराष्ट्रात उत्पादित होतो, आणि देशातून निर्यात होणाऱ्या कांद्यामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा८० टक्के असल्याची माहिती  बैठकीत देण्यात आली.