अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याच्या या निर्यात बंदीवरुन काँग्रेस राज्यात आंदोलन करत आहे. कांदा निर्यात बंदीचा आदेश मागे घेण्यात यावा, यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसने जोरदार निदर्शने केली.  काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयात कांदा फेकून केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता कांद्याला सुगीचे दिवस आले असताना जाणीवपूर्वक कांदा निर्यात बंदी लागू करून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या संख्येने काँग्रेसने निदर्शने केले. यावेळी केंद्र सरकार विरुद्ध जोरदार घोषणा करण्यात आली. शेतकरी अडचणीत आला असतांना निर्यात बंदी लागू करण्याची काही गरज नव्हती, असेही काँग्रेसने म्हटले आहे. 


केंद्र सरकारने केलेल्या कांद्याच्या निर्यात बंदीला शरद पवार यांनीही विरोध केला. शरद पवार यांनी भाजपच्या काही खासदारांसह वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. तसंच देवेंद्र फडणवीस यांनीही पियुष गोयल यांना पत्र लिहून ही निर्यात बंदी मागे घ्यावी अशी मागणी केली. शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ लवकरच या प्रश्नावरुन केंद्र सरकारची भेट घेणार आहे.