मुंबई : मुंबई, ठाण्यासह प्रमुख शहरांमध्ये कांदा महागला आहे. घाऊक बाजारात कांदा सरासरी ४२ रुपये किलोने विकला जात आहे. किरकोळ बाजारात कांद्यानं साठी गाठली आहे. कांद्याबरोबर इतर भाज्याही महागल्या आहेत. कांद्याने शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य सगळ्यांनाच रडवलं आहे.


कांदा महागण्याची कारणे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- परतीच्या पावसामुळे साठवण केलेल्या चाळीत पाणी शिरल्याने कांदा सडला.
- गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे कांदा उत्पादनात घट झाली आहे.
- शेतातला कांदा काढणीला येताच पावसानं हजेरी लावली त्यामुळे कांदा काढणी लांबणीवर पडली.
- नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतातला लाल कांदाही खराब होण्याची भीती आहे.


कांदा खराब होण्याच्या भीतीनं गेल्या वर्षीच अनेक शेतकऱ्यांनी कांदा विकून टाकला, त्यामुळे आताच्या हंगामात कांद्याची साठवण शिल्लक नाही 


कांद्यानं यंदा व्यापाऱ्यांचेही वांदे केले आहेत. सध्या नाशिक बाजारसमितीत कांदा सरासरी चार हजार रुपये क्विंटल आहे. कांद्याचा तुटवडा होऊ नये म्हणून परदेशातून कांदा आयात करण्यात आला. आयात कांदा वातावरणात टिकला नाही म्हणून त्याला उठाव नाही.


डिसेंबरपर्यंत कांद्याचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे. पावसानं उघडीप दिल्यास नवा कांदा लवकर बाजारात दाखल होईल. पण कांद्याचं हे सगळं गणित पावसाच्या लहरीपणावरच अवलंबून राहणार आहे.