योगेश खरे, चेतन कोळस, नाशिक : राज्यात या वर्षी कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहे. गेल्या वर्षी कांदा उत्पादक फायद्यात राहिल्याने त्याच अपेक्षेने कांदा सह आठ महिने सांभाळला मात्र आज त्याला फेकून देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या हंगामात सुमारे राज्यात नवशे कोटी तर नाशिक जिल्ह्यात सरासरी तीनशे कोटींचा फटका यामुळे बसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात पोळ म्हणजेच खरीपाच्या कांद्याची पंधरा ते सोळा हजार क्विंटल आवक झाली. त्याला सरसरी २ हजार ७४८ रुपये भाव मिळाला. तर उन्हाळ कांद्याची आवक अकरा हजार क्विंटल असताना २ हजार ९७५ रुपये भाव मिळाला. यंदा दहा हजार क्विंटलपेक्षा कमी आवक होऊनही पोळ कांद्याला सरासरी भाव सहाशेच्या घरात आहे. 


नेहमीच निर्यातीसाठी भाव खाणारा उन्हाळ कांद्याचा भाव तीनशेच्या घरात आहे. त्यात कांद्याचं उत्पादन घेण्यात आता अहमदनगर जिल्ह्यासह सव्वीस राज्यांनी आघाडी घेतलीय. परिणामी देशांतर्गत मागणी घटल्याने भाव कमी आणि शेतकरी संकटात आहे. 


नेहमीच आघाडीवर असलेला नाशिक जिल्ह्यातील शेतकरी यावर्षी निर्यातीत सर्वात मागे असून गुजरात आणि आंध्र प्रदेशने निर्यातीत आघाडी घेतलीय. त्यात पाकिस्तानने गुणवत्ता आणि कमी भावामुळे जागतिक बाजारपेठ काबीज केली. सरकारने याबाबतीत कुठलंही धोरण न आखल्याने पाकिस्तानी कांद्यापुढे भारतीय कांदा फिका ठरतोय. या सगळ्या परिस्थितीला निर्यात धोरणातील चुका कारणीभूत असल्याचं सांगण्यात येतंय. 


कांद्याच्या बाबतीत वाणिज्य मंत्रालयाची धरसोड वृत्ती आणि निर्यात धोरणात दूरदृष्टी नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्रालयाने आता कांदा पेरणी आणि उत्पादन यांची सांगड घालून नियंत्रण आणण्याची गरज आहे.