मनी ऑर्डर परत आल्यावर कांदा उत्पादक संजय साठेंचे मोदींना पत्र
साठे यांना त्यांच्या कांद्याला निफाडच्या बाजारात प्रतिकिलो फक्त १.४० किलो इतकाच भाव मिळाला होता.
नाशिक - कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने आलेले पैसे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पाठविणारे शेतकरी संजय साठे यांनी पुन्हा एकदा आपली कैफियत मांडण्यासाठी मोदींना पत्र लिहिले आहे. साठे यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेला कांदा काळसर होता, त्यामुळे त्याला भाव मिळाला नव्हता, असा अहवाल अधिकाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे सादर केला. हा अहवाल चुकीचा आणि दिशाभूल करणारा असल्याचे साठे यांनी पत्रात म्हटले आहे. कोणताही अधिकारी मला भेटण्यासाठी आलेला नाही. माझी बाजू कोणीही ऐकलेली नाही. त्याचबरोबर या अधिकाऱ्यांनी बाजार समितीत जाऊनही पाहणी केलेली नाही. तरीही चुकीचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडे सादर करण्यात आल्याचे साठे यांनी सांगितले. त्यामुळेच आपण पंतप्रधानांना पत्र लिहून हा मुद्दा उपस्थित केला असल्याचे ते म्हणाले.
संजय साठे हे नाशिक जिल्ह्यातील निफाडचे आहेत. त्यांनी आपला ७५० किलो कांदा बाजार समितीत विक्रीला आणला. त्याचे अवघे १०६४ रुपयेच त्यांना मिळाले होते. त्यामुळे त्यांनी चिडून ते पैसे मनी ऑर्डरने मोदींना पाठवून दिले. पण पंतप्रधान कार्यालयाडून त्याची मनी ऑर्डर स्वीकारण्यात आली नाही आणि ती परत पाठवण्यात आली. याबद्दल स्थानिक टपाल कार्यालयाने साठे यांना सांगितल्यानंतर त्यांनी निफाडमधील टपाल कार्यालयात जाऊन आपले पैसे परत घेतले. मला केवळ शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधायचे होते. बाकी माझा कोणताही उद्देश नव्हता, असे साठे म्हणाले होते.
साठे यांना त्यांच्या कांद्याला निफाडच्या बाजारात प्रतिकिलो फक्त १.४० किलो इतकाच भाव मिळाला होता. पंतप्रधानांकडील मदत निधीमध्ये जमा करण्यासाठीच हे पैसे आपण मनी ऑर्डरने पाठवले होते, असे साठे यांनी सांगितले होते. कांदा उत्पादकांच्या कष्टांना योग्य भाव मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार योग्य पावले उचलेल, अशी आपल्याला अपेक्षा आहे, असेही त्यांनी म्हटले होते.