नोव्हेंबरमध्ये कांद्याचे दर चांगलेच कडाडणार
कांदा रडवणार...
नाशिक : खरिपाचा कांदा लागवड लांबल्यामुळे उत्पादनही उशिराने येणार आहे. त्यामुळे येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे दर चांगलेच कडाडणार असल्याचा इशारा नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी दिला आहे. येणारा काळ शेतकऱ्यांसाठी सुगीचा असणार आहे तर सरकारसाठी परीक्षेचा असणार आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे याचे सरळ परिणाम हे बाजारभावावर होत आहे. कांदा सध्या किरकोळ मार्केटमध्ये ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे. राज्यभरात सुरू असलेल्या पावसामुळे कांदा उत्पादन लांबणीवर गेलं आहे. लागवडीला उशीर झाला आहे. तर अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाळी हंगामामध्ये किती कांद्याचं उत्पादन होईल याचा अंदाज नसल्याने उन्हाळी कांद्याचे भाव वाढू शकतात.
मुंबई बाजार समितीमध्ये कांद्याची आवक ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे आता कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.