राज्यात कांद्याचे दर कोसळायला सुरुवात
देशातल्या इतर राज्यांमध्ये कांद्याचं बंपर पीक निघाल्यामुळे कांद्याचे दर कोसळायला सुरुवात झाली आहे.
नाशिक : देशातल्या इतर राज्यांमध्ये कांद्याचं बंपर पीक निघाल्यामुळे कांद्याचे दर कोसळायला सुरुवात झाली आहे.
कमी झाले काद्यांचे भाव
शनिवार रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी नाशिकमधल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, कांद्याच्या दरात क्विंटलमागे सुमारे चारशे रुपयांची घसरण दिसून आली. शुक्रवारी चौदाशे रुपये क्विंटलने विकला गेलेला कांदा, सोमवारी अकराशे रुपयांना विकावा लागला. कांदा दरात अजून पडझड होण्याच्या शक्यतेनं, कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत.
काद्यांची आवक वाढली
राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरातसह, पश्चिम बंगालमध्ये नविन कांद्याची आवक झाल्यानं, तसंच राज्यातल्या पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याचं पिक आलं आहे. त्यामुळे मागणी कमी झाल्यानं भाव घसरल्याचं मत कृषितज्ज्ञ व्यक्त करत आहेत. तसंच होळीसाठी कामगार सुट्टीवर जात असल्यानं, कांदा लोडिंगसाठी मजूर मिळत नसल्याचा परिणामही दरावर होत असल्याचं सांगण्यात आलंय.