पर्यटकांनो सज्ज व्हा, `ताडोबा`ची ऑनलाईन बुकिंग पुन्हा सुरू...
चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं ऑनलाईन बुकिंग आजपासून पुन्हा सुरुवात होतंय. मात्र, बुकींगच्या दरात मोठी वाढ करण्यात आलीये.
आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचं ऑनलाईन बुकिंग आजपासून पुन्हा सुरुवात होतंय. मात्र, बुकींगच्या दरात मोठी वाढ करण्यात आलीये.
पट्टेदार वाघांच्या मुक्त संचारासाठी ख्यात असलेल्या चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाईन बुकिंगला मंगळवारी सकाळपासून पुन्हा सुरुवात झाली. बुकिंग करणारे ताडोबा परिघातील दलाल आणि रिसॉर्ट मालकांचा दबाव यांच्या मिलीभगतमुळे गेले काही महिने बुकिंग घोळ पुढे आला होता.
कित्येक महिने आधी बुकिंग करून ठेवत ऐनवेळी चढ्या दराने ती बुकिंग विकण्याचा प्रकार उजेडात आल्यावर बुकिंग रोखण्यात आले होते. नव्या प्रणालीनुसार आता पुन्हा बुकिंग सुरु करण्यात आलंय. मात्र, बुकिंगच्या दरात प्रचंड वाढ करण्यात आलीय.
असे असतील बुकिंगचे दर...
- १२० ते ६० दिवस आधी बुकिंग केल्यास शनिवार आणि रविवारी ८ हजार रुपये प्रति जिप्सी
- आणि आठवड्याच्या अन्य दिवशी ४ हजार रुपये प्रति जिप्सी मोजावे लागणार आहेत.
- ६० दिवस आधी बुकिंग केल्यास शनिवार / रविवार या सुटीच्या दिवशी २ हजार आणि इतर दिवशी १ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
- यापूर्वी शनिवार / रविवारी १००० रुपये आणि इतर दिवशी ७५० रुपये असा होता.
- तत्काल बुकिंगचा एक नवा पर्याय पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासाठी कोणत्याही दिवशी प्रति जीप्सी ४,००० दर असणार आहे. मात्र हे बुकिंग प्रवेशाच्या ३ दिवस आधी केले जाऊ शकणार आहे. यात प्रत्येक दिवशी ५ जिप्सीची मर्यादा असणार आहे
या नव्या दरपत्रकामुळे दलालांना चाप बसणार आहे. मात्र हौशीने वन्यजीवांना बघण्यासाठी ताडोबात पोचणा-या सामान्य पर्यटकांचे बजेट मात्र कोलमडणार आहे. जुन्या दरांच्या तुलनेत तब्बल आठ पट वाढ झाल्यानं पर्यटकांमधून नाराजी व्यक्त होतेय.