ऑनलाइन सर्च केलं असं काही की महिलेने गमावले 5 लाख , ही चुक तुम्ही करु नका!
Cyber Online Fraud: आजकाल सायबर क्राइमच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वेगवेगळी आमिषे दाखवत लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडत आहेत.
Cyber Online Fraud: सायबर क्राइमच्या प्रकरणांत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अलीकडेच एक नवीन प्रकार समोर आला आहे. महिलेने ऑनलाइन सर्चच्या नादात 5 लाख रुपये गमावले आहेत. महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. एका छोट्याश्या चुकीमुळं महिलेची आयुष्यभराची कमाई पाण्यात गेली आहे.
महाराष्ट्रात राहणारी 48 वर्षीय महिला घरातच लहान मुलांची ट्युशन घेते. एक दिवस अचानक तिने अधिक आर्थिक कमाईसाठी ऑनलाइन नोकरी शोधणे सुरु केले. त्यासाठी तिने काही वेबसाइटवर व्हिजिट केले. त्यानंतर तिला काही ठिकाणांहून नोकरीसाठी ऑफरही आली होती. तिकडून तिला चांगल्या सॅलरीची ऑफरही आली. ऑनलाइन सर्चिंगनंतर तिला ज्या नोकरीची ऑफर मिळाली ते वर्क फ्रॉम होम होते.
पार्ट टाइम वर्क फ्रॉम होमचा जॉब असल्यामुळं तिने एकीकडे ट्युशनही सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. तसंच, पूर्ण काम ऑनलाइन असल्याने सोप्पदेखील होते. स्कॅमर्कने महिलेला सांगितलं होतं की, पार्ट टाइम जॉबमध्ये तिला काही लिंक दिल्या जातील. त्यात वेगवेगळ्या सोशल मीडिया लिंक असतील. यातील प्रत्येक लिंकवर क्लिक केल्यास कमाई होईल. त्यासाठी तिला एका टेलिग्राम ग्रुपला कनेक्ट करण्यास सांगितले.
महिलेचा विश्वास जिंकण्यासाठी सायबर चोरट्यांनी तिला पहिले 1,000 रुपये आणि नंतर 1,400 रुपयांचा परतावा दिला. एकदा महिलेचा विश्वास जिंकल्यानंतर जास्त कमाईचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर पीडित महिलेने 5 लाख रुपये गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली. मात्र, गुंतवणुक केल्यानंतर तिला काहीच परतावा मिळाला नाही. त्यानंतर तिला आपण सायबर फ्रॉडचे शिकार झाल्याचा संशय आला. तिने तातडीने पोलीस स्टेशन गाठून या प्रकराणाची तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, फसवणूक झाल्याचे पीडितेला समजताच तिने तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. व्हिडिओ, सोशल मीडिया पोस्ट्स आणि सेलिब्रिटींच्या पोस्ट्स इत्यादींना लाईक करण्याच्या बदल्यात कमाईची ऑफर दिली जात असल्याचे प्रकार सध्या समोर येत आहेत. अनेक जण या घोटाळ्याचे बळी ठरले आहेत.
ऑनलाइन फसवणूक कशी टाळायची
ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी कोणत्याही अमिषेला बळी पडू नका हे महत्वाचे आहे. वास्तविक, ऑनलाइन फसवणूक करणारे अनेकदा लोकांना अतिरिक्त कमाईचे आमिष दाखवतात. पार्ट टाईम जॉबच्या लोभापायी अनेक जण फसतात. फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.
ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी, हे महत्वाचे आहे की तुम्ही तुमचा बँक ओटीपी इत्यादी कोणाशीही शेअर करू नका.
पार्ट टाईम जॉब्स किंवा व्हॉट्सअॅपवरून टेक्स्ट मेसेजच्या स्वरूपात येणारे मोठे कॅशबॅक देणारे संदेश दुर्लक्षित करा.
कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळा, हे लिंक तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात.
कोणताही QR कोड स्कॅन करणे टाळले पाहिजे, हा एक प्रकारचा घोटाळा असू शकतो, ज्यामुळे बँक खाते देखील रिकामे होऊ शकते.